मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी सही करण्यास नकार दिल्यानंतर छगन भुजबळ राज्यपालांच्या भेटीला सायंकाळी राजभवनावर जात आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत विधिमंडळात एकमताने निर्णय घेण्यात आल्यानंतरही याबाबत राज्यपाल आणि सरकार यांच्यातील संघर्षावर भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
ठपका दुसऱ्या कोणावर ठेवण्याचा प्रयत्न
मुनगंटीवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणमध्ये आपण नापास झालो याचा ठपका दुसऱ्या कोणावर ठेवता येतो का यासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सतत माध्यमांसमोर येत आहेत. नाहीतर त्यांनी राज्यपालांशी संपर्क केला असता. असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला. ते म्हणाले की, मला आश्चर्य याचे वाटते की, छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी राज्यपालांशी फोनवर बोलून घेतले पाहिजे. आपण एखादी फाइल सहीसाठी पाठवतो त्यावर विधी व न्याय विभागाने जर काही विपरीत शेरे दिले असतील ते पाहणे गरजेचे आहे. राज्यपाल हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याशी छगन भुजबळ यांनी फोनवर चर्चा केली पाहिजे असेही मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले.