बुरख्यावरुन देशात नवा वाद, बुरखा किंवा हिजाब घालायचा असेल तर पाकिस्तानात जा, श्रीराम सेनेच्या प्रमुखाचे वक्तव्य, हायकोर्टात ८ तारखेला सुनावणी

बंगळुरु : कर्नाटकात उडपीत शाळेत सुरु झालेला हिजाब वाद संपूर्ण राज्यात पसरला आहे. हिजाब मुस्लीम धर्मात अनिवार्य असल्यामुळे, त्याला शाळेत परवानगी द्यायला हवी, यासाठी विद्यार्थिनींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर तुम्ही भारताला काय पाकिस्तान, अफगाणिस्थान करत आहात का, असा सवाल हुबळीत श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिकि यांनी विचारला आहे. जर हिजाब किंवा बुरख्याची मागणी करत असाल तर पाकिस्तानात जा, असा वादग्रस्त सल्लाही मुतालिक यांनी दिला आहे.
या प्रकरणी मुस्लीम विद्यार्थिनींच्या याचिकेवर ८ फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी जस्टिस कृष्णा एस दीक्षित यांनी हे आदेश जारी केले.

काय आहे पूर्ण प्रकरण

यावर्षी जानेवारीत कर्नाटकात हिजाब विवाद सुरु झाला. उडपीत प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये, हिजाब घालून आलेल्या ७ मुलींना क्लासमध्ये जाण्यापासून रोखले. त्यानंतर मुलींनी विरोधी आंदोलन करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. घटनेतील अनुच्छेद १४ आणि २५ नुसार हिजाब घालणे हा मूलभूत अधिकार असल्याचे या विद्यार्थिनींचे म्हणणे असून, हा प्रकार मूलभूत हक्काचे हनन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालून क्लासमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका या आंदोलनकर्त्या मुलींना भेटल्यानंतर, आमदार आणि कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष के रघुपती भट यांनी घेतली होती.

शिवगोमात आंदोलोन शमले

कर्नाटकातच शिवगोमा जिल्ह्यात भद्रावतीच्या सरकारी कॉलेजमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब न घातला क्लासला हजेरी लावली. हिजाब घालून आलेल्या मुलींना वेटिंग रुममध्ये हिजाब काढून ठेवण्यास सांगण्यात आले. प्राचार्य एमजी उमाशंकर यांनी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केल्यानंतर या वादावर पडदा पडला. आंदोलन करणाऱ्या मुलींची समजूत काढण्यात कॉलेज प्रशासनाला यश मिळाले. यापुढे या मुली वर्गात हिजाब घालणार नाहीत.

हिजाबच्या विरोधात भगवा

जानेवारीत चिकमंगळूर येथे, काही विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये हिजाब घालून येणाऱ्या मुलींना विरोध करण्यासाठी भगव्या शाली पांघरण्यास सुरुवात केली होती. आता हे प्रकरण संपूर्म राज्यात पसरले आहे. मंगळवारीही या प्रकरणी आंदोलने करण्यात आली. हिजाब विरुद्ध भगवी शाल असा हा वाद आता राज्यात हुबळी, उडपी, कुंडापूर येथील शाळांत आणि कॉलेजांत पोहचला आहे. जिथे हिजाबच्या विरोधात भगव्याचा वापर होतो आहे.

३ वर्षांपूर्वीही झाला होता वाद

यापूर्वी ३ वर्षआधीही हिजाबवरुन राज्यात वाद झाला होता. तेव्हा कुणीही हिजाब घालू नये असा निर्णय़ घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून परुन्हा विद्यार्थीनी हिजाब घालून शाळेत येण्यास सुरुवात झाली. याचा विरोध भगवा घालून करण्यात येतो आहे. शाळा, कॉलेज प्रशासनाकडून अनेकदा या विद्यार्थिनींना हिजाब घालू नये सांगण्यात आले होते, तरीही या विद्यार्थिनी त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.

Social Media