मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी अबू बकरला (Abu Bakr)यूएईतून (UAE)अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अबू बकरला पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम(Underworld don Dawood Ibrahim) याचा जवळचा साथीदार असून गेल्या २९ वर्षांपासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्याच्याविरुद्ध १९९७ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अबू बकर याला याआधी २०१९ मध्येही अटक करण्यात आली होती. त्यावेळी काही दस्तावेजांच्या त्रुटीमुळे त्याची यूएईत सुटका झाली होती.
मुंबईतील १९९३ साखळी बॉम्ब स्फोट(The 1993 serial bomb blasts in Mumbai) हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्सचं लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. मुंबईतील १९९३ साली झालेल्या १२ साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल २५७ लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते. तर ७०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तब्बल २९ वर्षानंतर अबू बकर नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याचं माहिती सूत्रांनी दिले आहे. अबू बकरला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.