अभिनव प्रयोग, चंद्रपूर मध्ये औषधी वनस्पतींची लागवड…

चंद्रपूर जिल्हयातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड(Cultivation of Ayurvedic herbs) केली आहे. या माध्यमातून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट दाखवली आहे.

चंद्रपूर जिल्हा म्हणजे धान, सोयाबीन, कापूस आणि तूर यांचं पीक घेणारा जिल्हा…. जिल्हयातील या पारंपरिक पिकांमध्ये मेहनत जास्त आणि मिळकत कमी हे अगदी ठरलेलं सूत्र. त्यातही जंगली जनावरांच्या नुकसानीतून ही पिकं बचावली तर ठीक नाही तर नुकसान ठरलेलं. अशा विषम परिस्थितीत चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याने आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग केलाय.

 

चिमूर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ गजानन बनसोड यांच्या कडे ८ एकर वडिलोपार्जित शेती आहे. मात्र जंगलालगत असलेल्या या शेतात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे धान आणि तूर यासारखी पिकं फायदेशीर ठरत नव्हती. त्यामुळे डॉ.बनसोड यांनी कोरफड, काटेकोहळं, शतावरी, पांढरी हळद, महाभृंगराज, अनंतमूळ आणि कचोरा या सारख्या आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली. या पिकांची खतं, कीटकनाशकं आणि निगा राखण्याचा जास्त खर्च येत नाही. सोबतच या पिकांना वन्यप्राण्यांपासून कुठलाच त्रास होत नाही.

डॉ.बनसोड यांनी या आयुर्वेदिक वनौषधींमध्ये शेवग्याची लागवड करून आपला उत्पादन खर्च देखील कमी केलाय. डॉ. बनसोड यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात. कृषी विभागाने देखील त्यांच्या या अभिनव प्रयोगाचं कौतुक केलंय. मागील चार वर्षांपासून हा प्रयोग सुरू असून यामधून डॉ गजानन बनसोड हे वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. सोबतच त्यांनी उत्पादित केलेल्या वनौषधींवर प्रक्रिया करून अनेक आयुर्वेदिक औषधी व सौंदर्य प्रसाधन तयार करण्याचा प्रकल्प देखील सुरु केलाय. त्यांच्या या उत्पादनाची उलाढाल आता २५ लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे त्यांचा हा अभिनव प्रयोग पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श निर्माण करित आहे.

Social Media