चिमूरचे, श्रीहरी बालाजी…

विविधतेने नटलेला विदर्भ हा, नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. चिमूर, हे विदर्भातील, चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. चिमूर म्हटलं, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आठवण आपसूकच होते. चिमूर चे नाव स्वातंत्र्योत्तर काळात “चलेजाव आंदोलनासाठी” व त्यासाठी केलेल्या चळवळीसाठी, भारतभर प्रसिद्ध असून, १९४२ साली महात्मा गांधीच्या भारत छोडो आंदोलनात अग्रणी होते.

विदर्भातील अनेक जागृत देवस्थानांपैकी एक म्हणजे चिमूर येथील श्री बालाजी मंदिर. महाराष्ट्राचे तिरुपती या नावानेही हे मंदिर प्रसिद्ध आहे. चिमूर शहरातील प्राचीन अशा या श्रीहरी बालाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सतराशे चार (१७०४) साली झाली. आजतागायत भक्तजनांची मनोरथे पूर्ण करणारे हे चिमुरचे ग्रामदैवत आहे. अत्यंत पुरातन अशी ही मूर्ती, बरीचशी, तिरुपतीच्या मूर्तीसारखी दिसणारी.
चिमूरच्या श्रीहरी बालाजीची मूर्ती अतीव सुंदर, नयनरम्य, आकर्षक व जागृत आहे. ही मूर्ती तीन फूट आठ इंच, उंच असून चतुर्भुज व काळा गंडकी पाषाणाची आहे. हे पाषाण प्रतिमा घडविण्यासाठी वापरण्यात येत असतं.

श्रीहरी बालाजीचे मनमोहक रूप चित्ताकर्षक आहे. मुखकमलावर स्मित हास्य असलेल्या या श्रीहरी बालाजींच्या या मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हातात अक्षमाळ असून, शंख, चक्र व कौमुदी(गदा) ही आयुध व वस्तू आहेत. प्रतिमेस चार फूट सात इंच, उंचीची पाठशीळा असून, मूर्ती उठावात कोरलेली आहे. प्रतिमेच्या मागे प्रभावळ असून अडीच फूट रुंद आहे. मुकुटाचा प्रकार करंड असा आहे. पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. मंदिरातील गर्भगृहाची रचना समचतुष्कोणी आहे. गर्भगृहाचे बाहेर सभामंडप असून चोवीस स्तंभांवर ही वास्तू उभी आहे. गर्भगृहाच्या द्वारावर दोन्ही बाजूना गरुड, हनुमंत शिल्पित आहेत. या मूर्तीची दररोज पूजा-अर्चा नैवेद्य याची व्यवस्था संस्थांतर्फे केली गेली आहे. १७७२ ते १९६१ श्री भोपे हे देवस्थानचे वहीवाटदार होते. आजही भोपे कुटुंबाकडेच पूजा व नैवेद्य याची व्यवस्था आहे. तो त्यांचा अग्रक्रम आहे.

मंदिरात प्रतिवर्षी माघ शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमी पासून उत्सव सुरु होते. नवमीला गरुड वाहन, एकादशीला मारूतीवाहन, त्यानंतर दोन दिवसांनी ऐतिहासिक घोडायात्रेचे आयोजन केले जाते. गेली २५० वर्षांपासून माघ शु. त्रयोदशीस मंदिरात भव्य शोभायात्रा निघते. त्यास घोड्याची यात्रा असे म्हणतात. चिमुरची घोडा यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

श्रीहरी बालाजींची ही अश्वारूढ यात्रा आहे. हा अश्व एकसंघ काष्ट गोळ्यापासून पूर्णपणे तयार केलेला आहे. हा रेखीव घोडा चक्राकार रथावर ठेवतात. त्यावर स्वारमुद्रेत श्रीहरी महाराजांची प्रतिमा आणि महाराजांचे चार सैनिक यांची काष्ठ प्रतिमा ठेवली जाते. रात्री बारा वाजता नगर भ्रमण सुरु होते. ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. यावेळी श्रीहरी बालाजी महाराजांच्या जयघोषाने सारीनगरी दुमदुमून जाते.आतिषबाजी, फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला जातो. पहाटे उशिरापर्यंत ही यात्रा मंदिरात परतते. या साऱ्याच प्रतिमा घोडा, बालाजी, गरुड, हनुमंत, शिपाई, लाकडाच्या बनवलेल्या आहेत. इतरवेळी याच देवळात प्रदर्शनीय वस्तू म्हणून, देवालयाच्या पंचकमिटीच्या कार्यालयाच्या बाजूला एका काचेच्या कक्षात घोडेस्वार म्हणजे प्रत्यक्ष बालाजीची व त्याचे सैनिक, हनुमंत, गरुड यांच्या प्रतिकृती उभे करून ठेवलेले असतात. ही घोडा यात्रा म्हणजे विदर्भाचे भूषण ठरलेले आहे.

गेलेवर्षी मंदिराची अधिक माहिती घ्यावी या उत्सुकते पोटी, नागपूरला स्थाईक झालेले श्री चंद्रकांतजी भोपे यांचे सोबत संपर्क केला. सुंदर व्यवस्था त्यांनी लावून दिली. आणि चिमूरच्या मंदिरात श्रीहरींचे सुलभ दर्शन झाले. श्रीहरी बालाजी मंदिर देवस्थानचे व्यवस्थापक श्री अरविंदजी गोठे यांनी सविस्तर माहिती दिली. काही छायाचित्रे घेण्यास त्यांनी परवानगी दिली. त्यांचे आभार. घोडायात्रे नंतर गोपाळकाला आणि नवरात्र समाप्ती, असा तीन आठवड्यांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चिमूर घोडा यात्रा सलग पंधरा दिवस चालते व महाशिवरात्रीला यात्रेची सांगता होते.
ईथलं एक वैशिष्ट म्हणजे “वारां”नुसार श्रीहरींची आरती म्हटली जाते. मंदिरात वर्षभरात नवरात्र, वसंत पंचमी, रामनवमी, गोकुळष्टमी, दुर्गौत्सव, कार्तिक एकादशी असे कार्यक्रम आणि उत्सव सोत्साह पार पडतात.

कोरोना प्रकोपाचा तडाखा जसा इतर देवस्थानांना बसला तसाच या मंदिराला सुद्धा. गेली दोन वर्षं उत्सव साजरा झाला नाही, घोडा यात्रा निघू शकली नाही. परंतु यावर्षी मात्र हा उत्सव पार पडतो आहे. कोरानाचे सारे नियम पाळून येत्या चौदा फेब्रुवारीला प्रसिद्ध श्रीहरी बालाजींची घोडायात्रा नियोजित आहे.
विदर्भातील या भव्य दिव्य सोहळ्याचा आपण सारे सहभागी होवून आनंद लुटू या. श्रीहरी बालाजींच्या चरणी प्रार्थना की या कोरोनारूपी संकटाचा नायनाट व्हावा आणि जगात सौख्य नांदावे.
गोविदा, गोविंदा, गोविंदा….

श्रीकांत भास्कर तिजारे.
९४२३३८३९६६/७०३८८३९७६२


उत्तिष्ठत ! जाग्रत !!

महिला शिक्षणातील अग्रणी.. सावित्रीबाई

Social Media