मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का?
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठविले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असेही पटोले म्हणाले. तसेच हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे, त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या शाखा.
केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरु आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे ब्लॅकमेल करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही वारंवार सांगितलेले आहे. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कारवायांमधून हे दिसून आले आहे. सरकार पाडण्यासाठी उताविळ झालेले भाजपाचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम असून हे सरकार पडणार नाही आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते व भाजपाशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमय्यासारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत हे आता स्पष्ट झाले आहे असे पटोले म्हणाले.
फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोपही राऊत यांनी केले आहोत. भाजपच्या एका माजी मंत्र्यांने मुलीच्या लग्नात नऊ कोटींचे कारपेट अंथरल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. फडणवीस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचे काँग्रेस पक्षाने वारंवार सांगितले होते पण फडणवीसांनी कसलीही कारवाई न करता सगळ्या घोटाळेबाजांना क्लिन चिट देऊन टाकल्या होत्या. आता मविआ सरकारने या घोटाळ्यांचीसुद्धा चौकशी करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली.