राजकीय विश्लेषण किशोर आपटे
सध्याच्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्याची उंची खालावली आहे. राजकारणाचा स्तर पूर्ण घसरला आहे आणि नेत्यांच्या कुटूंब, हितसंबंधियांच्या पलिकडे जनतेच्या ख-या ज्या प्रश्नासाठी याना लोकांनी निवडून दिले आहे त्यांचा सोईस्कर विसर पडून सारेच हमाम मे.. असल्यासारखे तू तू मै मैच्या चिखलफेकीत रमले आहेत. या नेत्यांचे करायचे काय?
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत वाजत गाजत पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील विरोधीपक्षातील साडेतीन नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची आवई उठवली होती. त्यानंतर भाजपनेते किरिट सोमैय्या यानी देखील मुख्यमंत्र्याच्या कुटूंबियांच्या नावे बेनामी मालमत्ता कश्या होत्या आणि त्या आता कश्या चोरिला गेल्या यावरून कोकणात जावून हंगामा केला. या रोज सकाळी उठून सुरू असलेल्या चिखलफेकीतून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना आपण तेवढे स्वच्छ आहोत आणि समोरच्या पक्षाचा नेता भ्रष्टाचारी असल्याचे आवर्जून सांगायचे आहे. पण यातून सर्वात महत्वाचे निरिक्षण हेच नमूद करावे लागते की, महाराष्ट्राच्या सरकारसमोर आणि विरोधीपक्षांसमोर देखील कोविड नंतरच्या काळात निवडणूकीच्या पूर्वी मतदारांना दिलेल्या वचनांची जराही आठवण राहिली नसल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणेघेणे राहिलेले दिसत नाही. त्यामुळे उडदामाजी काळे गोरे. . किंवा हमाम मे सब. . . या म्हणी सारखे झपाट्याने विश्वासार्हता गमावून बसलेले राजकीय पक्ष आणि नेते यांच्या बद्दल जनतेच्या मनात कोणताही आदरभाव राहिला नाही. कारण या चिखलफेकीच्या राजकारणात गेल्या २५ वर्षापासून सोबत असलेल्या पक्षांचे नेतेच एकमेकांची घाण काढून दाखविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या पाठिराख्या असलेल्या सामान्य मतदाराचा पावलोपावली अपमान करत आहेत याचे भान त्यांना राहिले नाही. लोकांनी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर मते द्यावी असे सांगताना सध्या जे काही राजकीय धुळवड आणि रंगपंचमीचा नादान खेळ सुरू आहे त्यात लोकांच्या जगण्याचे प्रश्न बाजूला राहिले आहेत.
बालिश बहु बडबडला लिलांचे राजकारण
एकमेकांची उणीधुणी काढत लोकाच्या शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, आणि अन्य मुलभूत प्रश्नांकडे या सत्ताधा-यांना आणि विरोधकांना काही संबंध आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती झाली आहे. संजय राउत यांनी आरोप केल्यानंतर त्यावर नारायण राणे(Narayan Rane) आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे बोलणार त्यावर विनायक राऊत पुन्हाशेरेबाजि करणार पुन्हा किरिट सोमैय़ा काहीतरी ‘बोबडे बोलू खवतिके’ सांगायचा प्रयत्न करणार हे सारे पाहण्यात राज्यातील जनतेला काडीचाही सर नाही, सोमैय्याच्या कुटूंबाकडे किती काळे धन आहे, मुख्यमंत्रयाकडे किती आणि संजय राउतांच्या कुटूंबियाचे आर्थिक हित संबंध कुणाशी आहेत त्यात योग्य काय आणि अयोग्य काय हे लोकशाहीत अभिप्रेत नाही. इथे सर्वसमावेशक जनतेच्या भल्याच्या किंवा हिताच्या प्रश्नांवर राज्यकर्ते चर्चा करणार किंवा नाही लोकांना चांगले आयुष्य जगता यावे म्हणून त्यांच्या हिताचा काही कार्यक्रम राबविणार आहेत किंवा या गोष्टींवर माध्यमांतूनही काही चर्चा होताना दिसत नाही. किंवा माध्यमांना देखील असल्या पोरखेळ बालिश राजकीय नेत्यांच्या बालिश बहु बड बडला लिलांनाच राजकारण किंवा राज्यांच्या हिताच्या बातम्या म्हणून लोकांसमोर किती मोठ्या प्रमाणात सादर करायचे याचे भान ठेवायला हवे. ऐकमेकांच्या जीवावर उठलेले राजकीय नेते आणि त्यांचे चेले चपाटे हेच काय या राज्याचे संचित आहेत का? असा प्रश्न माध्यमे विचारीत नाहीत? इतके प्रवाह पतित होण्याचे कारण काय असावे?
निलाजरे आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचे फलित
वास्तविक संजय राऊत यांच्याशी निकटचे संबंध असणा-यांची इडी(ED) मार्फत चोकशी सुरु झाल्याने राऊत यांनी राजकीय दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. आणि राऊत यांनी शांत रहावे नाहीतर आमच्याकडे अजून खूप माहिती आहे ती आम्ही बाहेर काढू असे एका केंद्रीय मंत्र्याने एकेरीत येवून म्हणायचे. त्यानंतर हा हुतूतू सुरूच राहतो. मग खा विनायक राउत यांनी पुन्हा राणेंचा प्रतिवाद करायचा, त्यानंतर कोकणात केसरकरांकडून राणेंचा पाणउतारा करायचा, त्यावर पुन्हा राणे पिता पूत्रांकडून क्रिया प्रतिक्रिया येत राहणार हे सारे कोणत्या राजकीय परंपरेत मोडते? राज्यात जनतेच्या हितासाठी लोक प्रतिनीधी म्हणून वावरणा-या या नेत्यांकडून व्यक्तिगत हिताच्या पलिकडे लोकांच्या हिताचे काही काम होणार आहे की नाही? आपण लोकांच्या मताचा आदर करत नाहीत असेच या निलाजरे आरोप.
प्रत्यारोपांच्या राजकारणाचे फलित आहे काय?
या सगळ्यावादात आता नवी दिशा देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी व्टीट केले आहे की, काळ्या मर्सिडीजने पार्टीतून घरी आणले, ती वाझेची होती? या पूर्वी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या नाही हत्याच आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राणे यानी केले. या प्रकरणावा तपास सीबीआयला द्यावा म्हणून वर्षभरापूर्वी मोठे राजकारण झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून केंद्रीय यंत्रणाच्या तपासात फारसे काही नवे पुरावे अथवा प्रगती झाल्याचे दिसत नसताना केंदात मंत्री असलेल्या नेत्यानी अशी वक्तव्ये सरधोपट करणे कोणत्या नियम किंवा नितीमित्तेमध्ये बसते. बिहारच्या निवडणुकांमध्ये सुशांतसिंगच्या मृत्यूच्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्यात आली आणि आता पुन्हा वेगळी दिशा दिली जात आहे. नेत्यांच्या तोंडी अभिनेत्याच्या मरणाचे भांडवल करून कुरघोडीचे राजकारण होत आहे. मात्र ऐरवी छापे टाकत अगदी निस्पृहपणे काम करणा-या यंत्रणा या वाचाळवीरांना काहीच जाब विचारत नाहीत, न्यायालयातून यावर काहीच भाष्य होताना दिसत नाही. त्यामुळे पुण्यातून हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात या वाचळवीर नेत्याना आवरा त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडले आहे अशी जनहित याचिका दाखल केली आहे.
अश्या लोकांना आपले नेते म्हणून नेतेपण द्यायचे का
राज्यात नेत्यांच्या व्यक्तिगत हेवादाव्यांच्या राजकारणासाठी दंगलसदृश्य स्थिती तयार केली जात आहे आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. आणि भासवले जात आहे की राज्याचे ज्वलंत प्रश्न कुणाच्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला? कुणाच्या बायकोच्या नावे कुठे मालमत्ता आहेत? आणि आरोप करणारे मात्र कसे साजूक तुपातले आहेत! बॉलिवूडच्या अभिनेत्री अथवा त्यांच्या संबंधीत राजकीय लागेबांधे त्यातून होणारे वाद हत्या आणि अतमहत्या या गोष्टी या क्षेत्रातील जुन्या गोष्टी आहेत मात्र त्यांचा सर्रासपणे राजकीय आरोप प्रत्यारोपांत एकमेकाना नामोहरम करण्यासाठी वापर खुलेआमपणे केल्याने आपल्या नेत्यांचे पाय कशा मातीचे आहेत तेच समोर आले आहे. लोकांच्या हितासाठी हे पक्ष आणि नेते काही करत नाहीत ते त्यांचे राजकरण केवळ हितसंबंधीयांचे लागेबांधे जपण्यापलिकडे व्यापक जनहितासाठी नाही हेच उघड झाले आहे. अश्या लोकांना आपले नेते म्हणून नेतेपण द्यायचे का याचा आता लोकांनी मुळातून विचार करण्याची गरज आहे.
घरापर्यंत आणि कुटूंबियाच्या जीवावर उठण्यापर्यत जाणारे राजकारण
नारायण राणे(Narayan Rane) यांच्या कोकणातील आणि मुंबईतील घराचे बांधकाम बेकायदा आहे म्हणून पाडण्यासाठी नोटीसा देणे इत्यादी प्रकार राजकीय हिनतेच्या कोणत्या पतळीवर राज्याचे राजकारण चालले आहे हेच दाखवून देत आहे. यापूर्वी विरोधीपक्ष नेते असताना राणे यांच्या घराला राजकीय वैर भावनेतून पेटवून देण्यात आले होते. राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांचे घर जाळण्यात आल्यानंतर विधानसभेत त्यानी ज्याचे घर जळते त्यालाच त्याचे दु:ख कळते असे म्हणत आपली व्यथा मांडली होती. त्यावेळी राजकीय सूडाचे राजकारण करताना राजकारण करा पण घरापर्यंत आणि कुटूंबियाच्या जीवावर उठण्यापर्यत जाणारे राजकारण करत असाल तर हे कोणत्या लोकशाहीत बसते ? असा सवाल त्यावेळी राणे यांनी केला होता. मात्र आजही आपण त्यातून फार काही शिकलो असे म्हणण्याचे धाडस होत नाही.