महिला बहुविध प्रतिभासंपन्न; आगामी युग महिलांचे असेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

मुंबई : महिलांना निसर्गतः बहुविध प्रतिभा लाभली आहे. आजवर देशात आणि जगात पुरुषांचे वर्चस्व असले तरीही आता मातृशक्तीचा जागर होत असून जगात तसेच भारतात नव्या युगाचा उदय होत आहे. हे आगामी युग महिलांचे असेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई सोमवारी (दि. ७) येथे ‘पॉवरफुल विमेन ऑफ द यिअर’  पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मिड-डे वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री स्वरा भास्कर, हुमा कुरेशी, मेघना घई – पुरी, पायल घोष, झारा यास्मिन, शिखा तलसानिया, अवंतिका खत्री, डॉ दुरु शाह यांसह ३५ महिलांना ‘पॉवरफुल विमेन ऑफ द यिअर’ पुरस्कार देण्यात आले.  यावेळी मिड-डे समुहाच्या राष्ट्रीय व्यवसाय विकास प्रमुख संगीता कबाडी व वरिष्ठ व्यवस्थापक राहुल शुक्ला उपस्थित होते.

स्त्री ही शक्तीचे रूप असून या विश्वाचे नियंत्रण मातृशक्तीच करीत असते. विद्यापीठांमधील सर्वच दीक्षांत समारोहात आज मुलीच ९० टक्के सुवर्ण पदके प्राप्त करीत असून भारताला आत्मनिर्भर बनविण्यात महिलांचे योगदान मोठे असेल असे राज्यपालांनी सांगितले.

घरकाम करणाऱ्या महिलांकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. या महिला ४ – ५ घरांना  मदत करून स्वतःचे देखील घर सांभाळतात. या महिला म्हणजे स्त्रीशक्तीचे   शांत रूप असल्याचे स्वरा भास्कर यांनी सांगितले व आपल्या यशाचे श्रेय आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांना दिले. यावेळी हुमा कुरेशी यांनी सर्व महिलांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. संगीता कबाली यांनी आभारप्रदर्शन केले.

यावेळी डॉ दुरु शाह, दीपशिखा देशमुख, इराम आफताब फरीदी, अंजली रैना, मीना सेठी मोंडल, सुजाता ढोले, डॉ विद्युल्लता नाईक, वनिता भाटिया, प्रेरणा उप्पल, शिला ठक्कर, केतकी राणे, शिल्पा शिवराम शेट्टी, सीमा धुरी रणखांब, झरीन मनचंदा, आसमा  सय्यद, आंचल जयधारा, प्रिया गुरुनानी, चंद्रिका शाह, गौरी भट्टाचार्य, डॉ मणिमेकलाई मोहन, अक्षता वर्मा, महेक पुरोहित, झैनाब शेख, स्मिता पुरोहित, नेहा कंधारी, ऍड मीनल खून, कोमल लालपुरीया, महेश धनावडे, संजीव ठक्कर व योगेश लाखनी यांचा सत्कार करण्यात आला.

Governor Koshyari felicitates ‘Powerful Women of the Year’

Swara Bhaskar, Huma Qureshi, among those felicitated

Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Powerful Women of the Year 2022’ award to women achievers from various fields at Raj Bhavan Mumbai on the eve of International Women’s Day on Monday (7 Mar)

Social Media