नागपूर : मराठीच्या संवर्धनार्थ गेले कित्येक वर्षे आपले आयुष्य वांग्मयीन संस्कृतीची जोपासना करण्याकरता घालवणाऱ्या विदर्भातल्या काही प्रतिभावंत लेखक, कवी,कवयित्रींनी एकत्रित येऊन मुहूर्तमेढ रोवलेल्या मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूर या संस्थेने आजवर अनेक साहित्यिक उपक्रम राबविले. श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित धनवटे नॅशनल कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटक माजी कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष हेमंत काळमेघ, साहित्यिक डॉक्टर शोभा रोकडे, माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विजया मारोतकर, सचिव मंगेश बावसे, उपाध्यक्ष विशाल देवतळे धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्राचार्य महेंद्र मराठी विभाग प्रमुख डॉक्टर भारती खांडेकर आदी उपस्थित होते..
साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
सध्या राज्यात भोंग्याच्या राजकारणाचे वारे वाहत आहेत.. मात्र राजकारण्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे…
आजचे राष्ट्रीय नागरिकत्व सुद्धा धर्म जात पंथाने बाधित आहे कारण भारतीय संविधानाला धर्मं आहे पण समाजाचा वेगवेगळा धर्म आहे या विसंगती पूर्ण वास्तवाला जन्माला येणारे आमचे नागरिकत्व आणि साहित्य सुद्धा गटागटात विभागले गेले त्यामुळे मानवी समाजाचा मूलभूत विश्वात्मक कल्याणाचा ध्येयवाद पराभूत होतो आहे. विविध धर्म संदर्भीय नागरिकत्व आणि भारतीयत्वाचा अंतरंगी सुप्त संघर्षातून दुभंगलेपण जन्माला आले आहे. हे द्वंद्व संपवण्याचे प्रयत्न व प्रयोग सिद्ध करणारी यंत्रणा व विचार प्रणाली आज समाज जीवनात अस्तित्वात नाही जुने नवे संघर्ष जिवंत ठेवून आम्ही देश समाज संस्कृतीचा विकास करू पाहतो आहे. आमची राजकीय व्यवस्था वैचारिक व संपत्तीच्या भ्रष्टाचारातून केवळ सत्तेच्या स्वार्थात रमली आहे. त्यामुळे या देशाचे राजकारण सामान्य जनतेच्या विकासात खलनायक म्हणून उभे आहे राजकीय रंगभूमीवर नायकांच्या तुलनेत खलनायक संख्येने अधिक असल्यास सत्ता नाट्याच्या यशात लोकशाहीसह जनतेची शोकांतिका अटळ होते. केवळ राजकारणी मंडळीच सत्याच्या नावे स्वार्थाचे व साठमारीत पराक्रम करण्यात दंग असते, तर उपाय शोधणे शक्य होते परंतु राजकीय पक्षांच्या दावणीलाच जर सामान्य असामान्य जनता सुद्धा बाधली जात असेल तर आशेची किरण कुठे आणि कोणी शोधायची? लोकशाहीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे अस्तित्व शक्य व स्वाभाविक आहे पण सर्वच पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी व पक्षाच्या हितासाठी लोकशाहीचा खुळखुळा करून संविधानाला आग लावण्याचे पराक्रम करीत असतील तर 135 कोटी भारतीयांनी कोणावर विश्वास ठेवावा..
समाजाप्रती भूमिका घेणाऱ्या महिला : डॉ. शोभा रोकडे
स्त्रियांनी आपली भूमिका समजली पाहिजे. सावित्री बाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळेच आज आम्ही इथे आहोत त्यामुळे शिक्षणाचा आणि समाजाचे भान ठेऊन स्त्रियांनी वागले पाहिजे.. आत्मकेंद्रित न राहता. सामाजिक बांधिलकी देखील जपली पाहिजे. अजूनही स्त्रियांचे प्रश्न कायम आहेत. कुमारी मातांचं प्रमाण अजूनही समाजात आहेत.. लेखकांनी आपली भूमिका तपासली पाहिजे..
मायमराठी विसरून चालणार नाही : हर्षवर्धन देशमुख
साहित्य संमेलन कंटाळवाणे होत असतील तर त्यात आम्ही कशाला यावे असा प्रश्न पडतो.. इंग्रजी ही ज्ञानाची आणि व्यावहारिक भाषा असली तरी मायमराठी विसरून चालणार नाही.. अशी भावना माजी कृषिमंत्री हर्ष वर्धन देशमुख यांनी व्यक्त केली..माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख बोलत होते.
कोरोना नंतरच्या आव्हानात्मक काळात मराठीच्या संवर्धनार्थ साहित्यिकांची भूमिका
या विषयावर आयोजित पहिल्या परिसंवादाचे अध्यक्ष पद नाथे पब्लिकेशनचे संचालक तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक संजय नाथे भूषविले असून डॉ.मंदा नांदुरकर ,अमरावती, डॉ. अरुंधती वैद्य, नागपूर, मा. मिलिंद रंगारी ,गोंदिया ,डॉ.गणेश चव्हाण, नागपूर यांनी यात सहभाग घेतला होता. या सत्राचे सूत्रसंचालन अन गोविंद सालपे यांनी केले तर डॉ. पद्मिनी गोसेकर यांनी आभार व्यक्त केले. यानंतर या साहित्य संमेलनाची धुरा समर्थपणे खांद्यावर आपल्या घेऊन चालणाऱ्या प्रा. विजया मारोतकर यांच्यासह विशाल देवतळे ,मंगेश बावसे, मंजुषा कौटकर यांचा सहभाग असलेलेअभिरूप न्यायालय सत्र साकार झाले. यात विजयाताई मारोतकर यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडण्यात आल्या आणि या आरोपांना अगदी चपखल आणि स्पष्ट भूमिका घेत सर्व आरोपांना समर्पक उत्तरे दिली.