मुंबई : गणेश विसर्जना नंतर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेवून टाळेबंदीबाबत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात दिवसभर ठाण मांडून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील खासगी वाहनांना ई-पास कायम ठेवायचा की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल सेवा सामान्यांसाठी अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल वाहतूक सुरू आहे.
लोकल सेवा सुरू झाली तरच मुंबई पूर्वपदावर येईल, असा सूर आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करायची तर नेमके काय करावे लागले, याचीही चर्चा केली जाणार आहे. मात्र लोकल सेवा सुरू करतानाच कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत राज्यात टाळेबंदी किती दिवस चालू ठेवायची याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. परंतू गणेश विसर्जनानंतर याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.राज्यात वाहतूक सेवा, मॉल, हॉटेल्स सुरू झाले आहे. पण, अजूनही धार्मिक स्थळे बंद आहे. त्यामुळे काही ठिकाणीनियम आणि अटी कायम आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे लोकांना आता जास्त दिवस टाळेबंदीत ठेवता येणार नसल्याने टाळेबंदीबाबत ठोस धोरण करण्याकडे सरकारचा कल आहे.
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून देशाची आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे केंद्र सरकारने काही अटी शिथिल केल्या आहे. त्यामुळे राज्याअंतर्गत वाहतूक आता मोकळी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिना आता संपत आला आहे, त्यामुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात बरेच निर्णय मागे घेतले जाण्याची चिन्ह आहे. वाहतूक बंद असल्यामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे केंद्राने राज्यातील अंतर्गत वाहतुकीवरअसलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २० ऑगस्ट पासून एसटी बससेवा सुरू झाली आहे.