Monkey Poxचा मुंबईला धोका, महापालिकेनं उचलली महत्त्वाची पावलं

मुंबई :  कोरोनाचं सावट अद्याप कायम असतानाच ‘मंकीपॉक्स’ (Monkey Pox)या आजाराची चाहूल जगाला लागली आहे. आता मंकीपॉक्सनं धाकधूक वाढवली आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ११ देशांमध्ये मंकीपॉक्स रोगाच्या ८० प्रकरणांची पुष्टी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंकीपॅाक्सचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेकडून मुंबई विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली असून . विमानतळ अधिकारी परदेशातून आणि मंकीपॅाक्सची साथ असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, वॉर्ड क्रमांक ३० हा २८ खाटांचा तयार करण्यात आला असून त्यांचे चाचणी नमुने एनआयव्ही पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील. मुंबईतील सर्व आरोग्य सुविधांना रूग्णालयांना सांगण्यात आले आहे की, कोणत्याही संशयित प्रकरणाची सूचना प्रथम कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात यावी. मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे.

स्मॉल पॉक्स व्हायरस (Small Pox Virus)फॅमिलीमध्ये याचा समावेश होतो. ज्याची लागण झाल्यामुळे ताप येऊन अंगावर विचित्र झुबकेदार पुरळ दिसू लागतात. सहसा सौम्य समजल्या जाणाऱ्या या विषाणूचे दोन मुख्य स्ट्रेन आहेत. पहिला म्हणजे काँगो स्ट्रेन आणि दुसरा वेस्ट आफ्रिकन स्ट्रेन यापैकी काँगो स्ट्रेन हा अधिक गंभीर आहे. या स्ट्रेनमधील मृत्यूदर १० टक्क्यांपर्यंत आहे. तर, वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनमधील मृत्यूदर १ टक्क्यांच्या आसपास आहे. ब्रिटनमध्ये आढळलेले रुग्ण हे वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनचे आहेत. संसर्ग झाल्यापासून लक्षणं दिसून येईपर्यंतचा काळ असतो. हा कालावधी ७ ते १४ दिवसांचा असतो.

‘आतापर्यंच्या अभ्यासातून असं निदर्शनास आलं आहे की, आफ्रिका खंड वगळता बाहेर याची खूप कमी प्रकरणं नोंदवली गेली होती. आतापर्यंत फक्त आठ वेळा या प्रकराचे रूग्ण आढळले आहेत. ही अतिशय असामान्य गोष्ट आहे,’ अशी माहिती लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विषयाचे प्राध्यापक जिमी व्हिटवर्थ यांनी रॉयटर्सला दिली आहे.
मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होतो. याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये फ्लूची लक्षणे दिसतात. बहुतेक लोक काही आठवड्यांत बरे होतात. मात्र जर परिस्थिती आणखी बिघडली तर मात्र न्यूमोनिया देखील होऊ शकतो.

Social Media