२३ जून हा दिवस जगभरात ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा…

नाशिक : २३ जून हा दिवस जगभरात ऑलिम्पिक दिवस(Olympic Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने नाशिकच्या निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सेच्या वतीने भारताचे ऑलिंपियन पदक विजेते खेळाडू आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद(Major Dhyan Chand) यांचे चिरंजीव अशोक कुमार ध्यानचंद सिंग(Ashok Kumar Dhyan Chand Singh) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार , जिल्हा गोल्फ असोसिएशनचे सचिव नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते ऑलिंपियन अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांना सन्मानित करण्यात आले. याच निमित्ताने अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांच्या हस्ते रिव्हरसाईड गोल्फ कोर्से येथे उभारण्यात येणाऱ्या क्लब हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले.

उपस्थितांना संबोधित करतांना अशोक कुमार यांनी सांगितले की खेळाडूंनी आपल्यामध्ये जिद्द निर्माण करावी आणि त्याप्रमाणे मेहनत घेऊन आपल्या देशाचे नांव जगभरात पोचवावे. यावेळी संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी सांगितले की, सर्वांच्या सहकार्यातून उभा राहिलेल्या या रिव्हरसाईड गोल्फ कोर्सचा लाभ समाजातील सर्व खेळाडूंनी घ्यावा.

या कार्यक्रमासाठी अशोक दुधारे, राजीव देशपांडे, नितीन हिंगमिरे, आनंद खरे, सौ शीतल बागमार.प्रफुल्ल बागमार. जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. यावेळी तयार होणाऱ्या या क्लब हाऊसची सभासद नोंदणी सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ नाशिकच्या गोल्फ प्रेमींनी आणि खेळाडूंनी घ्यावा अशी माहिती प्रदीप बागमार यांनी दिली.

Social Media