मुंबई : वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मुख्य प्रवाह आहे तर वारी हा महाराष्ट्राचा सार्वजनिक उत्सव आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मूल्यविचार वारकरी संतांनी त्यांच्या अभंगातून मांडला. तोच विचार वारीच्या माध्यमातून सेलिब्रेट करायला हवा या भावनेनं ‘संविधान समता दिंडी’ संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून पंढरपूरला पोचणार आहे. काल महात्मा फुले वाड्यातून या दिंडीला सुरवात झाली. दिंडीत संविधानिक मूल्यविचारांना पूरक असे संतांचे अभंग, संविधानाविषयीचे अभंग आणि गाणी गात अनेकजण सहभागी झाले होते. ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला. जेजुरीच्या अलीकडे बेलसर फाट्याजवळ वारकरी संतविचार आणि संविधानिक मूल्यविचार यांच्या एकत्रित मांडणीची चर्चा झाली. यावेळी शेकडो संविधानप्रेमी उपस्थित होते.
आता आजपासून ही संविधान समता दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून १० जुलैपर्यंत पंढरपूरला पोचणार आहे. संविधानप्रेमी आणि परिवर्तनवादी समविचारी नागरिकांनी शक्य तिथे या दिंडीत सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत संविधानाच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावं. दिंडीत कुठे आणि कसं सहभागी होता येईल यासाठी दिंडी चालक हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज यांच्याशी संपर्क साधा.
श्यामसुंदर सोन्नर महाराज
9892673047