मुंबई : जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे(Supriyatai Sule) यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली.
एकत्र एका ताटात जेवलो असू तर त्या मिठाला जागायची सवय आहे…
आपल्या नेत्याच्या, वडीलांच्या आयुष्यात एखादा माणूस दोन मिनिटाचा आनंदाचा क्षण देऊन गेला असेल तर मी कधीही त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही कारण माझ्या आईची व मला महाराष्ट्रातील संस्कृतीची जाणीव आहे. ज्या नात्यामध्ये कधीतरी एकत्र एका ताटात जेवलो असू त्या मिठाला जागायची सवय आहे असे सांगतानाच माझी स्वतःची संस्कृती हेच छत्रपतींनी मला शिकवले आहे त्यामुळे वेदना एकाच गोष्टीची होते की जे लोक अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते आम्ही त्यांचा मानसन्मानच केला व प्रेमाचं नातं ठेवले माझ्या मनात त्यांच्याविषयी कालही प्रेम होते आणि आजही आहे व उद्याही राहिल असेही सुप्रियाताई सुळे (Supriyatai Sule)यांनी स्पष्ट केले.
नाती व सरकारे टेलिव्हिजनवर चालत नाही. ज्या काही मागण्या असतील त्या समोरासमोर मांडल्या पाहिजेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांचं नाव आपण घेतो तर संविधानाचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. त्यामुळे संविधानाच्या मार्गाने जायला नको का? छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचे नाव घेता मग समोरासमोर बसले पाहिजे ना जी काही मते असतील किंवा नसतील ती संविधानाने जगावी टेलिव्हिजनने नाही ओ असे खडेबोल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहेत.
उध्दव ठाकरे यांनी मोठा भाऊ म्हणून पोटात घेण्याची दानत दाखवली आहे याच्यापेक्षा काय हवं अजून…
तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. नाती असतात, जबाबदार्या असतात. माझे मतभेद असतीलही परंतु चर्चेतून मार्ग निघतो चर्चा तर झाली पाहिजे नाहीतर ती दडपशाही होते. एखादं मुल रुसलं म्हणा… चूकलं म्हणा परंतु आज उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) मोठा भाऊ म्हणून पोटात घेण्याची दानत दाखवत आहेत. मोठा भाऊ सगळं विसरुन… पोटात घ्यायला तयार असेल तर याच्यापेक्षा काय हवं अजून असे सांगतानाच संविधानावर (constitution)देश चालतो त्यामुळे चर्चा करा असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना ईडीची नोटीस आली यावर बोलताना हे दुर्दैवी आहे. ईडी ही पाच वर्षापूर्वी कुणाला माहीत होती. मात्र आज गावापर्यंतही ईडी माहीत झाली आहे अशी खोचक टीकाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आणि एकंदरीत केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली.