मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली पांडुरंगाची महापूजा

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या(Ashadhi Ekadashi) मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी  जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.

यंदा राज्यभरात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत. काहीसा उशिरा का होईना पण राज्यातील शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हीच मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.

यानंतर झालेल्या मंदिर समितीच्या कार्यक्रमात देखील त्यांनी सहभागी होऊन पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.

विशेष म्हणजे महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते मानाचे वारकरी असलेल्या नवले पती पत्नीचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह- अध्यक्ष ह.भ. प. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. गजानन गुरव आणि मंदिर समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित होते.

Social Media