मुंबई : मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा (dengue)ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे.पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लूनेही(swine flu) डोके वर काढले आहे. आठवडाभरात फ्लूच्या रुग्णांची संख्या ३ वरून ११ वर गेली आहे. जानेवारी ते जुलैपर्यत राज्यात १५ स्वाईन फ्लूचे (swine flu)रुग्ण आढळले आहेत.या वाढत्या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्तांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी पत्राद्वारे केली आहे.
मागील आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी, लेप्टोचा(lepto) प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात १२ जुलैला लेप्टोचे पाच रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवडाभरात यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये शहरात लेप्टोचे १२ रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने १७ जुलैपर्यंत ११ रुग्णांची नोंद झाली आहे.
शहरात डेंग्यूचा(dengue) प्रसारही कायम असून जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३९ होती. हिवतापाचा प्रादुर्भावही सुरूच असून जुलैमध्ये २४३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये ३५० रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रादुर्भाव असला तरी जुलैमध्ये चिकनगुनियाचे मात्र शून्य रुग्ण नोंदले आहेत.