मुंबई : रायगड (Raigad)जिल्ह्यातील प्रकल्पबाधितांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. तसेच या प्रकल्पाबाबत आवश्यकतेनुसार केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Vikhe Patil) यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद आमदार बाळाराम पाटील यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत जयंत पाटील, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.
महसूल मंत्री विखे पाटील यांनी लक्षवेधीला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि खालापूर तालुक्यातील आठ गावांमधील १५५८.२४ एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यापैकी १०२२.६२ एकर जमीन हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल लि. आस्थापनेच्या ताब्यात आहे. येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे, ही शासनाची भूमिका आहे. त्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन वाढीव मोबदला तसेच प्रकल्पात भूमीपुत्रांना सामील करून घेण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव देऊ, असेही महसूल मंत्र्यांनी सांगितले.