१९७८ चा तो काळ. कुष्ठरोग्यांना समाजाकडून अत्यंत वाईट वागणूक दिली जायची. घरातली सख्खी माणसं त्यांचा जाच करायची, तुसडेपणाची वागणूक द्यायची. जिथे जातील तिथे अवहेलनाच. त्यांच्यासोबत बोलायलाही लोक टाळायचा. सरकारी दवाखान्यातही त्यांची हेळसांड, त्यांच्यावर उपचार करायला कर्मचारी धजावत नसत. अशा वेळी त्यांच्यासाठी एक आदिशक्ती धावून आली. त्यांच्यासारख्या अनाथांवर करुणेची माया घातली. त्यांच्या जीवनात उमेदीची नवी पालवी फुलविली. ही आदिशक्ती आहे मंगल शहा…
मंगलताईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुष्ठरोग्यांसाठी काम करायला सुरु केलं. ‘माझं माहेर पंढरी’ म्हणत दरवर्षी वारकऱ्यांची वारी विठुराया चरणी लिन होते. त्याच विठुरायाच्या पंढरीत अर्थात पंढरपूरमध्ये ही मंगल माऊली कुष्ठरोग्यांसाठी पुढे सरसावली. त्यांचे ड्रेसिंग करायला सरकारी आरोग्य कर्मचारी धाडस करत नव्हते तिथे या माऊलीने आपल्या हळुवार हातानी त्यांच्या जखमा पुसून काढत, त्यावर ड्रेसिंग करून फुंकर घातली.
कुष्ठरोग्यांसाठी काम करतानाच सोबत रिमांड होममधील मुलींना आंघोळ घालणे, त्यांची वेणी फणी करणे, संस्कार वर्ग घेत होत्या. वेश्यावस्तीत जाऊन त्यांच्या मुलामुलींना सोबत घेऊन प्रभातफेऱ्या काढून समाज प्रबोधन करत होत्या. १९९९ पर्यंत त्यांची ही समाज प्रबोधनाची चळवळ सुरु होती. ज्या काळात एचआयव्ही ( एड्स ) बद्दल बोलणेही पाप होते त्याकाळात मंगलताईंनी वेश्यावस्तीत जाऊन प्रबोधन केलं. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लेकरांचा सांभाळ केला.
समाज प्रबोधनाचे काम करता करता घडलेल्या एक घटनेमुळे पालवीचा जन्म झाला. वर्ष २०००. एके दिवशी वाडावस्तीत फिरताना त्यांना जनावरांच्या गोठ्यात दोन मुले दिसली. ती अनाथ मुले पाहून त्यांच्या मनात मायेची पालवी फुटली. नातेवाईकांनी वाळीत टाकलेली, गुरांच्या गोठ्यातील ती एचआयव्ही बाधित बालके नजरेस पडली. प्रबोधनाची जागा सक्रिय हाताने घेतली.
आतापर्यंतच्या कामामुळे त्यांना पंढरपूरमध्ये ‘बाई’ नावानं ओळखलं जात होतं. मंगल बाईंनी त्या मुलांचा सांभाळ करायचं ठरवलं. त्या मुलांना स्वतःच्या घरी आणलं. फाटलेले आभाळ मंगलताईनी आपल्या डोक्यावर घेतलं. घरात १० वर्षांची मुलगी डिंपल, आशिष, राजेश ही दोन मुले. त्यांना आणखी दोन मुलाची सोबत झाली.
एड्सग्रस्त बालकांना माया, प्रेम, जिव्हाळा, योग्य आहार, औषध उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यांचा तो हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘पालवी संगोपन प्रकल्प’ची स्थापना केली. एचआयव्हीच्या अज्ञानातून पदरी उपेक्षा आलेल्या बालकांना स्मशानभूमी, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचराकुंडी अशा ठिकाणी सोडून दिले जाते. असा निराधार बालकांना मायेची ‘पालवी’ मिळाली.
पालवीमध्ये अशा बालकांना सांभाळले जाते याची माहिती समजत गेली आणि पालवीत अशा मुलाचे प्रमाण वाढू लागले. इथे येणारी बालके जखमांनी भरलेली, अंगात त्राण नसलेली असायची. डॉक्टरही त्यांना दवाखान्यात घ्यायला उत्सुक नसायचे. मंगलबाई मग स्वतः त्यांचे ड्रेसिंग करत. या मुलांसाठी जागेचा शोध सुरु झाला. जवळच एक जागा घेतली. पण, जागा मालकाने बालकांसह तेथे राहण्यास मज्जाव केला. पाणी बंद केले. घरून पाणी नेऊन हा संसार सुरू झाला.
गोठ्यात सापडलेल्या त्या दोन बालकांपासून सुरू झालेल्या पालवीत आज ११० बालके आहेत. समाजाला केलेल्या आवाहनातून पालवीला स्वतःची चार गुंठे जागा मिळाली. वयात आलेल्या आणि शिक्षण पूर्ण झालेल्या बालकांचे विवाह करून देण्याचे धाडस मंगलताईंनी केले. आज त्या विवाहित दाम्पत्यांची अपत्ये पूर्णतः निरोगी आहेत. रोज एक नवीन आव्हान, रोज एक नवीन जबाबदारी. पण न थकता, न हरता, न थांबता चालत राहतो त्याला यश निश्चित मिळते याचाच आलेला हा प्रत्यय म्हणावा.
पालवीमध्ये विशेष असे सहा प्रकल्प आहेत. बालकांच्या सकस आहारासाठी गोशाळा सुरू केली आहे. गोशाळेतील गायीमुळे दूध, ताकाची गरज पूर्ण होते. मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गोमूत्र, अग्नी होत्र यांचा वापर सुरू केला. एचआयव्हीग्रस्त महिलांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यांच्यासाठी आधार गट स्थापन केला. त्यामधून महिलांना शिलाई, शेतीकाम. कागदकाम शिकविण्यात येते. कागद कामापासून ते गोधडीपर्यंत जवळपास ७० वस्तू तयार करुन त्या विकल्या जातात.
सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, विस्मृतीत गेलेले अनेक खेळ गाणी यांचा परिचय करून देणे हा पालवीचा आणखी एक उपक्रम. ज्याला गरज त्याला आसरा देऊ या पद्धतीने मनोरुग्ण महिलांसाठी माहेर प्रकल्प सुरु केला आहे. तर, हिरकणी प्रकल्पात अत्याचाराने पिडीत कुमारी माता, मनोरुग्ण मातांचा सांभाळ केला जातो. बाळंतपणानंतर त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जाते.
समाजामध्ये भंगार/कचरा वेचणाऱ्या लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मुलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी पालवीने पंढरपूर येथील वसाहतीमध्ये काम चालू केले आहे. मंगला शहा यांनी मानवसेवेला यज्ञ समजून सुरु केलेलं हे काम आता त्यांची मुलगी डिंपल घाडगे, नातू तेजस आणि नात कोमल समर्थपणे पुढे नेत आहेत.
पालवीची संपूर्ण जबाबदारी डिंपल घाडगे सांभाळते. नातू तेजसने मेडिकलमधून एमएसडब्ल्यु केले आहे. तर नात कोमल हिने सायकोलॉजी विषयात बीए केलंय. एका निरक्षर पिढीने सुरु केलेलं काम सुशिक्षित पिढीने पुढे न्यायचे हे तत्व त्यांनी अंगिकारलं आहे. कोमलने तर आजी, आईच्या पावलावर पाऊल ठेवत पालवीत स्वतःचा प्ले ग्रुप सुरु केला आहे. आशिष आणि राजेश ही मंगलताईंची मुले सोबत आहेतच. आपलं घरदार सांभाळून संपूर्ण कुटूंबच्या कुटूंब नव्हे तर तीन पिढ्या सामाजिक जाणिवेने प्रेरित होऊन काम करत आहेत.
सेवाव्रत स्वीकारलेल्या मंगलताई, डिंपल घाडगे यांच्यासारख्या व्यक्ती स्वयंसिध्द आहेत. प्रशस्ती, प्रसिद्धी, मानपण, सत्कार यापेक्षा त्यांचे कामच बोलतं. त्यांच्या गुणांची, सेवावृत्तीची समाजाला ओळख करुन देण्याचा हा एक प्रयत्न… उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांच्यासोबतच जिव्हाळा.हे वरदान पालवीला लाभलंय. पण, हा ऋतू पाहण्यासाठी पालवीला भेट द्यावी लागेल हे ही तितकंच खरं.. मग कधी भेट देताय?
मंगल शहा
डिंपल घाडगे – 9860069949
पालवी प्रकल्प
प्रभा हिरा प्रतिष्ठान, घाटगे प्लॉट,
कराड नाका, पंढरपूर, सोलापूर – 413304