बाळासाहेबांच्या विचारांच्या सरकारला गाडगेबाबांच्या विचाराचे वावडे? गाडगेबाबांची दशसूत्री माजी मंत्री यशोमती ठाकुरांच्या पाठपुराव्याने मंत्रालयात पुन्हा झळकली

मुंबई  : राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा फलक राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानतो असे सांगणा-या शिंदे सरकारने हटविला होता. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने मंत्रालयात फलक लावण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर नव्या सरकारला त्याचे वावडे असल्याचे पहायला मिळाले. मात्र  हा फलक पुनर्स्थापित करावा यासाठी माजी मंत्री तसेच संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा काँग्रेस आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी पत्र पाठवून केलेल्या पाठपुराव्यामुळे शिंदे सरकार नरमलेआणि पुन्हा गाडगेबाबांचा संदेश दर्शनी भागात  मंत्रालयात लावण्यात आला आहे.

उध्दव ठाकरे यांना पायउतार करून राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे ‘इडी’ सरकार येताच महाविकास आघाडी सरकारचे जनहिताचे निर्णय स्थगित करत त्यात बदल करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्याचा फटका मंत्रालयात लावण्यात आलेल्या संत गाडगेबाबांच्या विचारांच्या फलकाला देखील बसला आहे. मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबाच्या दशसूत्रीचा फलक एकाएकी हटविण्यात आला त्यामुळे राज्य सरकारी कर्मचा-यांसह  सामान्य जनतेमध्येही संताप व्यक्त केला जात होता.

संत गाडगेबाबाचे संपूर्ण जीवन स्वच्छता, समाजप्रबोधन आणि समाजकार्यासाठी खर्च झाले ‘भुकेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी’ असे दहा सूत्र संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीमध्ये आहेत त्याचा फलक मंत्रालयात ठाकरे सरकारने लावला म्हणून हटविण्यात आल्यानंतर संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २७ ऑक्टोबर २०२२ रोजी थेट पत्र लिहित आपल्या संतप्त भावना कळवल्या होत्या. तसेच पूर्वीप्रमाणेच फलक लावण्याचा आग्रह करतानाच समाज माध्यमातूनही हा विषय लावून धरला होता.

अखेर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या  पाठपूराव्याला यश आले असून सरकारला माघार घ्यावी लागली आहे. संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसात नव्याने लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख वगळून मंत्रालयात दशसूत्रीचा फलक त्याच जागी पुनर्स्थापित करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये येणा-या जनतेसमोर पुन्हा एकदा संत गाडगेबाबांचे विचार तेवत राहतील, याबाबत ॲड. यशोमती ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Social Media