नवीमुंबईत महापालिका निवडणुकांपूर्वी महाविकासची झलक!; बाजार समितीच्या सभापतीपदी बारामतीचे जावई बिनविरोध! भाजपचा ‘बाजार’ उठल्याची प्रतिक्रिया!  

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच होणा-या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत तीन पक्ष एकत्र लढून विजयाचा नवाइतिहास लिहीणार आहेत. त्याची सुरूवात आज नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांच्या सभापतीपदाच्या विजयातून झाली आहे.

उपसभापतीपदी धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती ही डक यांची सासरवाडी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांना सभापतीपद मिळाले. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना उपसभापतीपद बिनविरोधपणे देण्यात आले.एपीएमसी सभापती निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची समजली जात होती. महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व एपीएमसीवर प्रस्थापित झाले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजपला खातेही उघडता आले नाही. सहा महसूल आणि चार व्यापारी मतदारसंघात भाजपला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने महाविकास आघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवले होते. राज्यातला महाविकास आघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्ये यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते. दरम्यान, अशोक डक यांना शरद पवारांकडून एकनिष्ठेचे फळ मिळाले आहे. पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिक मासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया माजलगावकरां मधून व्यक्त होत आहे.

अनेक वर्षापासून शरद पवार यांच्याशी जिल्ह्यातील ज्या काही एकनिष्ठ कुटुंबांची नावे समोर येतात, त्यात स्व. गोविंदराव डक यांचे अग्रगण्य नाव आहे. अशोक डक यांना मुंबईचे सभापतीपद मिळणार हे उघड गुपित होते. अशोक डक यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली. उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून धनंजय वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचीही निवड उपसभापतीपदासाठी झाली असून दोघांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.

Social Media