नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतलेल्या राज्यांच्या यादीत आसाम सामील झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याची माहिती दिली आहे. वाढीव भत्ता ऑक्टोबर महिन्याच्या पगारासह दिला जाईल.
हिमंता बिस्वा सरमा यांनी लिहिले की मला राज्य सरकारी कर्मचारी/अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांसाठी 01 जुलै 2022 पासून 4% अतिरिक्त महागाई भत्ता जाहीर करताना आनंद होत आहे जो या महिन्याच्या पगारासह देय असेल.
आसाम सरकारने राज्यातील होमगार्ड्सच्या दैनंदिन ड्युटी भत्त्यात वाढ केली आहे. होमगार्डचा भत्ता 300 रुपयांवरून 767 रुपये करण्यात आला आहे. राज्य सरकारने सांगितले की, वेतनवाढीनंतर होमगार्डचे मासिक वेतन 23,010 रुपये होईल.
अनेक राज्यांनी दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवल्यानंतर आसाम सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्या राज्यांनी DA आणि DR वाढवला आहे त्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशा यांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने 1 जुलै 2022 पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढवली. याचा फायदा 41.85 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. डीए आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढवल्यानंतर ती 38 टक्के झाली आहे.