देवाचे वैभव सांभाळावे…

तन तिरंगा, मन तिरंगा, चाहत तिरंगा, राहत तिरंगा, विजय का विश्वास तिरंगा| किती समर्पक ओळी आहेत या. आज दीपावलीच्या दिवशी हिमालयाच्या शिखरावरून व्यक्त केलेली ही मनाची भावना तिरंगा ध्वजा प्रतीचे अतूट प्रेम, आपल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करताना व्यक्त केलेल्या प्रेरणादायी भावना.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची कार्यशैलीच वेगळी आहे, हे आपण जाणतोच. गेल्या एक महिन्यात एकापाठोपाठ एक अशा अनेक धार्मिक स्थळांना भेटी देत, कुठे शिलाण्यास, कुठे लोकार्पण, कुठे भावी योजनांची पायाभरणी तर कुठे प्रतीकात्मक राज्याभिषेक सोहळ्यात सम्मिलित होत प्रकाशपर्वाचा अत्यानंद घेत, आज दिवाळीच्या दिवशी थेट कारगिल गाठलं. काय ती उर्जा? त्यांच्याच शब्दात सांगायचं तर प्रभू श्रीरांमचंद्रांच्याच आशीर्वादाने हे सहज शक्य होत. “सियापती रामचंद्र की जय” असा जयघोष करणारे मा. पंतप्रधान मोदिजी देशाच्या सीमेवर जावून “भारत माता की जय’ वंदे मातरम्” या घोषणा किती सहजतेने देतात. एका अध्यात्मिक भावविश्वातून लगेचच शौर्य पथावर प्रवेश करतानाची सहजता दिसून येते.

आपण सारेच जाणतो मोदीजी “शंकर भक्त” आहेत. म्हणूनच वाराणसी क्षेत्रातून पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते म्हणाले होते, “मा गंगा ने मुझे बुलाया है|”. त्यांची सांस्कृतिक विरासती/वारसा यांचे प्रती आस्था ओतप्रोत भरलेली आहे. ती दिखाऊ किंवा बेगडी नाही हे विशेष. देशातील पर्यटन क्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी मोदीजींचे सरकार प्रयत्न करीत आहे. त्यातूनच रोजगार निर्मिती होते. होत आहे. काशी विश्वनाथ कोरीडॉर, महाकाल लोक, चारधाम मधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांचा होत असलेला विकास, त्यांचे बदलले स्वरूप ही त्याची साक्ष आहे.

अयोध्या| आम्हा भारतीयांचं आराध्य दैवत, भगवान श्रीराम. राम जन्मभूमी विवादावर सकारात्मक तोडगा निघाला आणि भव्य राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग सुकर झाला. भूमिपूजन झालं. कार्य प्रगतीपथावर आहे. काल, अयोध्या नगरीत गेली काही वर्षे सातत्याने कीर्तिमान रचणाऱ्या दिपोत्सवाच्या प्रकाश पर्वाचा आनंद स्वतः पंतप्रधानांनी घेतला. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू अमुच्या ने जीवना…पंधरा लक्ष दिव्यांच्या साक्षीनं, हा माझा भारत देश एका नव्या उंचीवर जाणार याची ग्वाहीच जणू दिली जात आहे असं वाटलं. नुकताच उज्जैन येथे संपन्न झालेला महाकाललोक, रामायण सर्किट यासारख्या उपक्रमातून संस्कृती रक्षणावर भर दिला जातो आहे. येत्या काळात मांडू, महेश्वर, इंदौर, ओंकारेश्वर, हनुवंतिया, झाबुआ हे सुद्धा टूरिस्ट सर्किट म्हणून सज्ज होताहेत.

दूरचित्रवाहिन्यांवरील ही सारी भव्य आयोजने बघून खरोखरीच अभिमान वाटतो. मला तर समर्थ रामदास स्वामिनी त्यांच्या “दासबोधात” वर्णिलेल्या “दास्यभक्ती” या प्रकारातील सातव्या समासातील तिसरी ऋचा आठवते. “देवाचे वैभव सांभाळावे, न्यूनपूर्ण पडोची नेदावे| चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे|
आज या साऱ्याच श्रद्धा स्थानांचा होणारा कायाकल्प, काळानुरूप होणारे बदल, आपल्या या मंदिरांचं, पर्यायाने देवाचं वैभव सांभाळत आहेत असं मला वाटतं. आज या श्रद्धास्थानावर होणारी श्रद्धाळू यांची गर्दी पर्यटनाला चालना देणारी आहे. रोजगार निर्मिती करणारी आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. मोदीजींच्या दूरदृष्टीचं खरोखरच कौतुक आहे. बाबा भोलेनाथांची ही प्रेरणा आहे. केदारनाथ, बद्रिकेदार येथे दोन दिवस घालवून, लगेचच अयोध्या येथे भगवान प्रभू रामचंद्रांची तिजोमय पूजा बांधून दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयू तीरावर तर, दुसऱ्याच दिवशी थेट आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबत दिवाळीची भेट.

अशावेळी आशा भोसले यांनी गायलेलं, “धन्य ते संताजी धनाजी” या चित्रपटातील “देश हा देव असे माझा..” हे गीत आठवतं. आमचा प्रत्येक जवान, सैनिक हा देशावर प्रेम करतो. त्याच्या लेखी “माझा भारत देश हाच माझा देव” असतो. म्हणूनच मोदीजी या सैनिकांसोबत आपली दिवाळी गेली अनेक वर्ष साजरी करताना आपण बघतो. कारण “देवाचं वैभव सांभाळावं”. आधुनिक शस्त्र संपन्नते सोबतच, तुम्ही एकटे नाही तर सारा भारत देश तुमच्या पाठीशी आहे” हा विश्वास मोदिजींच्या उपस्थितीने आपल्या शूर वीर जवानांना वाटतो. सकारात्मक उर्जा निर्माण होते. मोदीजी सुद्धा “देश सर्वोपरी” असच सांगत असतात. ते कृतीतून दाखवीत असतात. “अशी घडावी माझ्या हातून, तेजोमय पूजा”. देश म्हणजे देशातील दगड धोंडे नव्हे तर देशातील माणसे, आपण सारे. आपल्या साऱ्यांच्या रक्षणासाठी कायम घरादारांपासून दूर राहणाऱ्या, आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या, जवानांना देश हाच देव असतो. समर प्रसंगी हे जवान आपल्या पंचप्राणांचा नैवेद्य अर्पुन या देशरूपी देवाची पूजा करतात. मोदिजींचा सहवास एक वेगळीच उर्जा आपल्या या प्रहरीना देवून जाते. त्यांचे मनोबल वाढविते.

“तुज साठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण..” स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा देशाला देवच मांनले आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्रतेच्या स्तोत्राची रचना केली. त्यांनी राष्ट्राला भगवती असे संबोधलं आहे. मोदीजी सुद्धा भगवतीचेच उपासक आहेत. हे भारतमाते तुझ्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर. कारण तुझ्यासाठी मरण हेच आमचं जगणं आहे आणि तुझ्याशिवाय जगणं हे कसलं जगणं?

सदैव भारताचे नाव मोठं व्हावं यासाठी प्रयत्नशील असणारे मोदीजी आज आपल्या परिवारात म्हणजे भारतीय सैन्यासोबत राहून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करत आहेत, यासारखी अभिमानाची गोष्ट आम्हा भारतीयांसाठी अजून काय असू शकते?

स्वातंत्र्याच्या अमृततुल्य काळात आपल्या परंपरांचा, संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची नितांत गरज आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या संकल्प शक्तीतच रामराज्याच गुपित दडलेले आहे.
चला तर, “सब समाज को लिये साथ में, आगे है बढते जाना” या निश्चयाने आपणही तेजोमय राष्ट्र उभारणीसाठी संकल्प सिद्ध होऊ यात.

 

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६


घर एक मंदिर आहे…

संवेदना: एक हात मदतीचा…

Social Media