मंकी बात…

कश्यासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे ? कश्यासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून’,  किंवा  ‘जगतात येथे कुणी कुजून कुजून म्हणती हे वेडेपीर तरी आम्ही राजे’ असे एक गीत सामना(samana) या श्रीराम लागू(Shriram Lagoo) आणि निळू फुले (Nilu Fule)यांच्या गाजलेल्या भुमिका असलेल्या सिनेमात आहे. त्या काळातील या सिनेमातील गिताच्या शब्दानी सुज्ञ जाणकार आणि दर्दी भावनाशील माणसांच्या हृदयाचा नेमका ठाव घेतला जातो. आजही रविंद्र साठे(Ravindra Sathe) यांच्या आवाजातील हे गित ऐकताना माणूस न कळत अंतर्मुख होवून जातो. या गिताच्या शब्दा शब्दात एक ताकद आहे एक नजाकत आहे. जुन्या गाण्यांमध्ये आशय, संदर्भ आणि कलात्मक भावुकता यांचा बेमालुम साज असल्याने ती गाणी ऐकताना आजही आपल्याला त्या काळात घेवून जातात. आज हे गाणे इथे आठवण्याचे कारण काय? तर तेच ते आणि तेच ते!

मंकी बात

महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात अतिमहत्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी २०१४ पासून जो धुमाकूळ घातला आहे, त्यात सामान्य माणसाचे जगणे हरवून गेले आहे. पण प्रसिध्दी माध्यमांत काम करताना यांत्रिकपणे काम करण्याचे आणि गिरणी कामगारांसारखे देशोधडीला लागण्याच्या स्थितीत आलेले मराठी पत्रकारितेचे विश्व या सा-या घडामोडीकडे केवळ मूक दर्शक म्हणून पाहताना जे मनात येते त्याला शब्दात मांडायचे कसे हाच प्रश्न आहे. सा-या राजकीय जगाच्या उठाठेवी करणा-या राजकीय पत्रकारितेमध्ये २५ वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेल्या माझ्या सारख्या पत्रकाराला देखील हे सारे पाहताना मनात असंख्य इगळ्या डसाव्यात अश्या वेदना होत असल्याचे डाचत राहते. सध्याच्या चेहरे आणि मुखवट्यांच्या राजकारणात संविधान, विधी विधान आणि साधन शुचिता या गोष्टी केवळ सांगण्या बोलण्याच्या राहिल्या आहेत. काही मुख्य राजकीय पक्ष आणि त्यांचे काही नेते पछाडल्या सारखे सत्तेसाठी काय वाट्टेल ते अश्या पध्दतीने राजकारण करताना पहायला मिळाले आहे.

याचा अर्थ यापूर्वीच्या काळात जेंव्हा आम्ही राजकीय पत्रकारितेमध्ये कार्यरत नव्हतो त्या काळात सारेच कसे छान होते असा भाबडा समज माझा नाही किंवा कुणाचाही असू नये. पण जे काही पाहिले आणि अनुभवले आहे अगदी फार जुन्या काळात नाही तरी १९९५ पासूनच्या राज्यात बदललेल्या राजकीय संदर्भातील मी पाहिलेल्या काळातले तरी सध्या जे काही भेसूर, विक्षीप्त, अक्राळविक्राळ आणि सत्तालोलूपपणे सुरू आहे त्याची खरेच महाराष्ट्राला गरज आहे का ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

मंकी बात

सध्याच्या राजकारणाने आणि राजकीय नेत्यांनी जनतेच्या डोळ्यादेखत जे काही खेळ मांडियेला तो लोकशाहीच्या कोणत्या कोंदणात बसवायचा असे म्हटले तरी ते समजणे आकलना पलिकडचे म्हणायला हवे. अगदी २०१९ नंतरचे राजकारण तर इतके व्यक्ती साक्षेप आणि अतिसंत्ताकेंद्री अंधविवेकी झाल्याचे पहायला मिळाले की त्याची आठवण झाली तरी माझ्या सारख्याला किळस आल्याची जाणिव होते. दोन तीन मुख्य व्यक्तींच्या अति महत्वाकांक्षी राजकीय विचार आणि कृतींमुळे देशाच्या राज्याच्या लक्षावधी जनतेचा खरेच या लोकांना विसर पडला आहे आणि मी, माझे आणि माझ्यापुरते या तीनच गोष्टीचा ते विचार करत असावेत अशी खात्री पटते.
दुसरीकडे उद्याच्या महाराष्ट्राच्या सुशिक्षीत नव्या पिढी समोर असंख्य आव्हाने आहेत, एका बाजुला जगात मोठ्या मोठ्या शास्त्रीय संशोधनाची आणि आर्थिक सुबत्तेची स्पर्धा असताना आपल्या देशाच्या लक्षावधी सामान्य घरातील तरूणांसमोर येणा-या २५ तीस वर्षानंतर काय वाढून ठेवले आहे? याचा विचार हे सत्ताधारी करताना दिसत नाहीत याची पदोपदी जाणिव होत राहते. देशाच्या संरक्षण दलापासून सर्वत्र तरूणांच्या शक्ती बुध्दीला बांध घालणा-या निर्णयांची मालिकाच असल्याचे जाणवते. उद्योग व्यवसाय नोक-या याशिवाय तरूणांच्या अंगभूत कला आणि कल्पनाशक्तीला सध्याच्या राजकीय रचनेत नको त्या जीवघेण्या संघर्षात इतके कोंडून टाकले जात आहे की त्याच्या मनात जगण्याचा तिटकारा येत असावा. मग कोवळी पोरे आत्महत्या करताना दिसत आहेत. लहान वयाचे शेतकरी, कामगार, विद्यार्थी ताणामुळे मानसिक संतुलन(mental balance) हरवून जिवाला लावून घेताना दिसत आहेत. याचा संबंध सध्याच्या राजकीय व्यवस्थेतून आलेल्या परिस्थितीचा नाही असे म्हणून कुणी या विवेचनाला झटकून टाकायचा प्रयत्न करतील, हीच ती बेदरकार पाशवी वृत्ती सध्याच्या राजकीय नेतृत्वाला ख-या खु-या देशाच्या उज्वल भविष्याचा विचार, रचनात्मक नियोजनापासून दूर नेताना दिसत आहे.

सारे काही सत्ताधारी आणि विरोधी यांच्या पुराणातील देवदानव समुद्र मंथनाच्या गोष्टीसारखे सुरू आहे. त्यात भरडली गेली आहे इथली सामान्य जनता त्याचा कुणी कधी मनस्वीपणे शांतपणे विचार करेल का? ही राक्षसी राजकारणाची भूक त्यांना तशी उसंत मिळू देईल का? कुणाला या सा-या स्थितीमध्ये आपण चुकतो आहोत असे वाटले तरी त्याच्या वक्तव्यात नंतर जे हताशपण दिसते ते पाहिले की मग हा खेळ कधीच संपणार नाही का? की एका सुंदर शक्तीशाली राज्याच्या तरूणांच्या एका पिढीला उध्वस्त करूनच सारे संपुष्टात येईल असा घनघोर प्रश्न घोंघावत राहतो.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यासारख्या संवेदनशील राजकीय नेत्याने ख-या खु-या मनातील गोष्टी दिवाळीच्या गप्पामध्ये बोलताना व्यक्त केल्या. या राजकारणामुळे आलेली कटूता कशी जाणार? कोण पुढाकार घेणार? असा प्रश्न त्यांना पडला होता. त्याला नंतर सामना मध्ये देवेंद्रजी त्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या म्हणून सामनेवाले पार्टीने देखील आवाहन केले होते. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झाले आहे, असो. तुर्तास काही चांगले घडो, सामान्य मराठी जनतेच्या जीवनात सुख, समाधान विकास आणि विश्वास वाढेल असे काही करण्याची या राजकीय नेत्याना परमेश्वर सदबुध्दी देवो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबूया!  इतकेच.

के शू भाई!


मंकी बात…

Social Media