मंकी बात

भाजपला २०१९च्या विधानसभेतील सत्तेचे गणित सुधारायचे असेल तर करावे लागेल ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळवून घेण्याचे ‘शहा’ णपणाचे राजकारण!?

२०१९च्या विधानसभेत बिघडलेले सत्तेचे गणित भाजपला सुधारायचे असेल तर शिवसेनेला मुंबईत  साथ देवून जुळवून घेण्यातच ‘शहा’णपणाचे राजकारण आहे. कारण ज्या गटाच्या भरवश्यावर शिवसेना संपल्याचा भास निर्माण केला जात आहे ती राजकीय चाल यश मिळवून देणारी नाही हे या निकालानंतर भाजपच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच पुन्हा नवा सत्तांतराचा प्रयोग केला जाण्याच्या बातम्या झळकू लागल्या असून नव्याने आयोध्या ते गुवाहाटी प्रयोग केला जाण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

 एकनाथ शिंदे

‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है,’ . . .  या उर्दु कहावती नुसार मुंबईच्या अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके(Ramesh Latke) यांच्या पत्नीला मतदारांनी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे मुळ नाव नसतानाही ६५ हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी केले आहे. या निवडणुकीत भाजपचे मुरजी पटेल यानी माघार घेतल्याने भाजपच्या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे सांगण्यात येत आहे, तर पटेल याना २०१९ मध्ये रमेश लटके यांच्या समोर अपक्ष म्हणून मिळालेल्या ४७ हजार मतांचा अंदाज घेतला तर या पोटनिवडणुकीत लटके यांचा एकतर्फी विजय झाला आहे हे स्पष्ट होते.

२०१९ मध्ये रमेश लटके(Ramesh Latke) यांनी सुमारे वीस हजारांच्या फरकाने पटेल यांना हरवले होते. यावेळी ऐनवेळी पटेल याना माघार घ्यावी लागली, त्याचे कारण गुजरातच्या निवडणुका हे असले तरी भाजपने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला दिला होता. ज्या संस्कृतीचे विस्मरण भाजपला कोल्हापूर मंगळवेढा आणि देगलूर मध्ये झाले होते! मुरजी पटेल जर  मैदानात राहून हरले असते तर त्याचा परिणाम भाजपच्या गुजरातच्या मतदानावर झाला असता कारण पटेल पाटीदार हा गुजरातमध्ये भाजपचा मुख्य मतदार आहे. अंधेरीची पोट निवडणुक केवळ २५ महिन्यांसाठी असून २०२४च्या मध्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. मुंबईतील पटेल समाजाकडून भाजपला केवळ मतांची नव्हे तर आर्थिक रसद देखील पुरवली जाते त्यादृष्टीने पटेल यांची माघार होण्यात भाजपचा राजकीय हेतू स्पष्टच होता. मात्र तरीही एकनाथी भारूडात म्हटले आहे तसे किंचीत राहिली फुणफुण. .  अशी भाजपच्या मुंबई (Mumbai)अध्यक्षांच्या प्रतिक्रिया देताना दिसली. लटके यांचे अभिनंदन करताना आपल्याकडे विजयाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसला!

असो. . . मतमोजणी प्रक्रियेत एकूण ६६,५३० मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके  विजयी झाल्या आहेत, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील केली. त्यानंतर पाटील यांनी विजयी उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. अंधेरी पूर्व’ या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व २५६ केंद्रावर दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण ३१.७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून  उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

१) श्रीमती ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३० २) श्री. बाला व्यंकटेश नाडार (पक्ष – आपकी अपनी पार्टी ) : १,५१५
३) श्री.मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : ९००
४) श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष ) : १,५३१
५) श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : १,०९३
६) श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष ) : ६२४
७) श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : १,५७१    आणि  नोटा : १२,८०६
एकूण मते : ८६,५७०  अवैध मते – २२

या विजयानंतर लटके यांनी प्रतिक्रिया देताना हा विजय आपल्या पतीने या मतदरासंघात जी विकास कामे केली त्यांना मतदारांनी दिलेली पोचपावती आहे अशी होती. लटके यांचे मातोश्री या उध्दव ठाकरे यांच्या निवास स्थानी जोरदार स्वागत झाले, तेथे माध्यमांनी  उध्दव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी मशाल भडकली भगवा फडकला अश्या शब्दात दै सामनाची दुस-या दिवशी प्रसिध्द  होणारी हेडलाईन सांगावी तशी प्रतिक्रिया दिली. यावेळी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सह वंचित बहुजनपक्ष, संभाजी ब्रिगेड आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले. यावेळी लटके यांच्या विरोधात अपक्ष सात उमेदवारांच्या मतदानापेक्षा जास्त सुमारे १२ हजार पेक्षा अधिक मते नोटा च्या पर्यायाला पडल्याबाबतच्या प्रश्नावर ठाकरे यांनी ज्या उमेदवाराने माघार घेतली त्यांच्या जागी मते नोटाला पडल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. या पोट निवडणुकीत कॉंग्रेसने आपला उमेदवार दिला असता तर किंवा अन्य महाविकास आघाडीमधील पक्षानी उमेदवार दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते. मात्र शिवसेनेच्या लटके यांना महाविकास आघाडीसह अन्य संघटना आणि पक्षाचां पाठिंबा होता. त्याच वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यानी लटके यांचा विजय भाजपने माघार घेतल्याने झाला असून त्याचे श्रेय भाजपला जाते असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.

devendra-fadnavis

या विजयामुळे शिवसेनेवर राजकीय हल्ला करणा-यांना अजूनही जाग यावी अशी अपेक्षा करायला हवी मात्र ती करताना अपेक्षाभंग होण्याची शक्यताही गृहित धरली पाहीजे. कारण मुंबई महापालिका निवडणुकांचे मैदान आता महिनाभरावर आले आहे आणि त्यापूर्वी गुजरातमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची अग्निपरिक्षा होत आहे. शिवसेनेकडून गुजरात निवडणुका न लढण्याचा निर्णय होण्याची शक्यता असून तसे केल्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखविण्याची भाषा केल्यानंतरही उध्दव ठाकरे यांनी समंजसपणाची भुमिका घेतल्याचा संदेश गुजरातला जाणार आहे.

एकीकडे राज्याचे प्रकल्प गुजरातला नेल्याचा आरोप करत भाजप विरोधात शिवसेनेचे आदित्य ठाकरे सुभाष देसाई यानी रान उठवले असताना गुजरातमध्ये शिवसेनेकडून ज्या काही १७ ते २० जागांवर मराठी मतदार आहेत त्या भागात उमेदवार न उतरविण्यामागे कॉंग्रेस पक्षाला शांतपणे मदत करण्याचा विचार असू शकतो. किंवा भाजपला उपकृत करत समंजसपणाची भुमिका घेत मुंबई महापालिकेत भाजपने देखील या राजकीय निर्णयाचा फायदा शिवसेनेला मिळुन देण्याची धुर्त राजकीय गणिते असू शकतात. मात्र अंधेरीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मुंबईतील शक्तीचा अंदाज, जनभावना आणि स्वत: उध्दव ठाकरे यांची मानसिकता या तीनही गोष्टीचा अंदाज करता येण्यासारखे आहे.

अंधेरीच्या निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व पुसायला निघालेल्या आणि त्यासाठी थेट निवडणुक आयोगाकडे जावून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी करणा-या मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोर गटाचे अस्तित्व मात्र कुठेच दिसले नाही. मात्र लटके यांच्या नोकरीचा राजीनामा मंजूर न करण्यापर्यंत जे किळसवाणे राजकारण करण्यात आले त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का लागला आहे, याची त्यांना कल्पना नसावी असे कसे बरे म्हणता येईल.? रमेश लटके हयात असताना त्यांचे शिंदे यांच्याशी असलेले जवळकीचे संबंध पाहता शिंदे यांच्याकडून जे राजकारण झाले त्यामुळे भाजपसोबत त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेलाही धक्का बसला आहे मात्र आता वेळ निघून गेली आहे.

आदित्य-ठाकरे

या निवडणूक निकालाने काही गोष्टींचा मात्र नकळत निकाल लागला आहे, त्याची भाजपच्या नेत्यांना कदाचित जाणिव झाली असेल तरी त्याची वाच्यता केली जाणार नाही. त्यामुळे त्याचा उल्लेख येथे करून थांबूया. या निवडणुकीने हे स्पष्ट झाले की शिवसेनेला शिवसेना म्हटले नाही आणि धनुष्यबाण चिन्ह नसेल तरी अपेक्षीत मतदार मात्र कुठेही हलत नाही. रमेश लटके यांना ओळखणा-या मतदारांनी त्यांच्या पश्चात निवडणूक चिन्ह नसताना पक्षाचे नाव बदलले असताना मतदान करत त्यांच्या पत्नीला विजयी केले आहे.

दुसरा मुद्दा हा आहे की भाजप विरोधक म्हणून शिवसेना उभी राहिली की तिच्या सोबत भाजपला विरोध करणारे संभाजी ब्रिगेड, माकपासह अन्य सारे विरोधक एकजूट होवून प्रसंगी शिवसेनेसोबत असलेले जुने हाडवैरही बाजुला ठेवून भिडतात. त्यामुळे मुंबईत शिवसेनेला हरविण्याची स्वप्ने बघणे वाटले तितके सोपे नक्कीच नाही.

तिसरी आणि महत्वाची गोष्ट ज्या कारणाने शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासह ४० आमदार भाजपच्या बाजुने घेण्यात आले ते कारण म्हणजे शिवसेनेला पर्यायी नवी शिवसेना उभी करणे. ती गोष्ट देखील शक्य नाही. कारण शिवसेना म्हणजे ठाकरे हे समिकरण आहे आणि ठाकरेंना शिवसेनेपासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला वर्षानुवर्षे युतीमध्ये शिवसेनेसोबत राहून मुंबई महापालिकेच्या सत्तेवर बसायची संधी मिळाली नसली तरी२०१७मध्ये शिवसेनेच्या विरोधात जावून उलटी सुलटी गणिते मांडली तरी पहारेक-यांची भुमिका घ्यावी लागली होती. २०१९च्या विधानसभेत बिघडलेले सत्तेचे गणित सुधारायचे असेल तर शिवसेनेला मुंबई ताब्यात देवून जुळवून घेण्यातच शहाणपणाचे राजकारण आहे. कारण ज्या गटाच्या भरवश्यावर शिवसेना संपल्याचा भास निर्माण केला जात आहे ती राजकीय चाल यश मिळवून देणारी नाही हे या निकालानंतर भाजपच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच पुन्हा नवा सत्तांतराचा प्रयोग केला जाण्याच्या बातम्या झळकू लागल्या असून नव्याने आयोध्या ते गुवाहाटी प्रयोग केला जाण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत अशी राजकीय सूत्रांची  माहिती आहे!

के शु भाई.


 

मंकी बात…

Social Media