मुंबई :ख्यातनाम कमी व माजी आमदार शांताराम नांदगावकर यांच्या स्नुषा आणि खानदेशचे प्रख्यात डॉ. चितळे यांची कन्या पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत दादर येथील टिळक भवन या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, “सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे. काँग्रेसच्या विचाराला माननारे लोक राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. देश तोडण्याचे काम काही पक्ष व संघटना करत असताना देश जोडण्याची भूमिका घेऊन मा. खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ऐतिहासिक पदयात्रा सुरु केली आहे. तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारे महत्वाचे असतात ही लोकांची भावना आहे. काँग्रेस विचाराने प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे,” गायिका सुहासिनी नांदगावकर यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस प्रदेशाध्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
“काँग्रेस हाच सर्व जाती-धर्मांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणारा पक्ष आहे. मागास, वंचित, दलित समाजाच्या विकासाचे काम काँग्रेस सरकारनेच केले परंतु सध्या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. दलित, मागास, पीडित समाजाचा विकास व्हायचा असेल तर काँग्रेस पक्षच करु शकतो याचा विश्वास असल्यानेच मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून एक कलाकार म्हणून कलाकारांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठीही काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करेन.”असे गायिका सुहासिनी नांदगावकर यांनी म्हटले आहे.
अशी ही बनवाबनवी, तू सुखकर्ता, गोडी गुलाबी, हिंदी चित्रपट सैनिक, स्टंटमन, छोटा सा घर आदी चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत. ३० वर्षांपासून त्या पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत असून देश विदेशातही त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीत शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे.