मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve ) ९ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने आयोजित आक्रोश मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत.
२०१७ साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या १ लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी. नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरीत मिळावे.२०१८ पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना त्वरित चालू करावी. विहिरी दुरूस्तीसाठी खचलेल्या बुजलेल्या विहीरीसाठी अनुदान मिळावे आदी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर समस्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.