मुंबई : पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू अपू-या आरोग्यसेवेमुळे झाल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मनसे आणि भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. जनता संकटात घेरली असताना मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडणार आहेत? दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापूर्तीसाठी ते मुख्यमंत्री झाले असतील तर इच्छापूर्तीसाठी एक आणि काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा”, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. पत्रकार पांडुरंग रायकड यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुण्याचे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
“उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही. पण मुख्यमंत्री झाले. अजित पवार यांना त्यांच्या मताचा अधिकार मिळाल्यापासून ते आमदार आहेत. कोणतेही सरकार येऊ दे ते आहेतच. मग ते देवेंद्रजींसोबत उपमुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरेंसोबतही उपमुख्यमंत्री आहेत. ही ताकद ते वापरणार आहेत की नाहीत? ते कडक हेडमास्तर आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. पण त्यांनी ते दाखवले पाहिजे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.“दिल्लीच्या बरोबरीने पुण्याची कोरोना परिस्थिती झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी न घेता दिल्लीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणली. अजित दादा जवळ गेले तरी लांब-लांब रहा म्हणतात. तब्येतीची काळजी घेतली पाहिजेच. पण मग परिस्थिती नियंत्रणात कशी आणणार?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
याच मुद्यावर मुंबईत विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले तर स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे, पण ते कधी घराबाहेर पडतील असा खोचक सवाल केला आहे. तर मनसेचे संदिप देशपांडे यांनी देखील घरात बसून राहण्यासाठी ठाकरे यांना मुख्यमंत्री केले नाही असा राग व्यक्त केला आहे.