मुंबई : मागील आठवड्यात मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांचा पुण्यात ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संगीता यांच्या पतीला नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार न करणा-या डॉक्टरांवर कारवाई करा, अशी तक्रार संगीता करुनही या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून थेट मंत्रायलासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.या प्रकरणात तीन जणांपैकी एका महिलेचा आधीच मृत्यू झाला आहे.
संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यावेळी पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीच्या वेळी भरधाव गाडीखाली संगीता यांचे पती चिरडले गेले होते. या भीषण अपघातात त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल होती. मद्यप्राशन केल्यामुळे कारचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी होती. मात्र त्याप्रमाणे कारचालकावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. नेरुळ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात गंभीरता दाखवली नाही आणि कारचालकाला सोडून दिल्याचे. संगीता यांचा दावा होता.
या प्रकरणात कठोर कारवाई करा यासाठी संगीता मोठ्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारताना राज्य सरकारकडे न्याय मागण्यासाठी मंत्रालयात आल्या.पोलीस विभागाकडूनच न्याय मिळत नाही हे पाहून त्यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यालाही सरकारने गंभीर घेतले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी मंत्र्यालयासमोर जाऊन विषप्राशन केले . त्यांचे पती हनुमंत डवरे अजूनही सावरले नाही आहेत. या अपघातात त्यांच्या हातापायांना गंभीर इजा झाली होती. त्यावर योग्य उपचार न झाल्याने अपघात होऊन वर्ष उलटल्यानंतरही त्यांना चालता येत नाही. शिवाय आतापर्यंतच्या त्यांच्या उपचाराचे पैसेदेखील त्यांनीच दिले आहेत. बिलाची फाईल अजूनही पोलीस दलाने मंजूर केली नसल्याचा आरोप संगीता यांनी केला आहे.त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या पत्नीलाच न्याय मिळाला नसल्याने अनेक स्तरावरुन संताप व्यक्त केला जात आहे.