मुंबई : गेल्या महिनाभरापासून राज्य सरकारमध्ये पोलिस दलातील बदल्यांबाबतचा वाद मिटला असून बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला आहे. त्यात नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.
पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमार सिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा अंतिम झाली. त्याअधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतही मुख्यमंत्री यांची चर्चा झाल्या.
पोलीसांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्यानंतर माजीगृहमंत्री, विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे टिका केली आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात ४२ टक्के चाचण्या वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे सांगत मुंबईत चाचण्या वाढवा अशा आशयाचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. यात राज्यातील चाचण्यांची टक्केवारी आणि मुंबईतील चाचण्यांची टक्केवारी नमुद करण्यात आली आहे.
देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इथल्या नुकासानग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत.