शुक्रवारी बिग बॉस २(Bigg Boss 2) चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानं नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. हाच एल्विश यादव काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी आरती करताना दिसला होता. त्यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना व सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी(Sanjay Raut) आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. नोएडा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नोएडा व आसपासच्या भागातून पाच गारूडींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच नाग व विषही जप्त केलं. आपण एल्विश यादवला विष पुरवायचो, असा कबुलीजबाब या गारूडींनी दिल्यानंतर पोलिसांनी एल्विश यादवसह सहा जणांविरोधात गुन्हा दाख केला आहे. एल्विश यादवनं नोएडातील एका रेव्ह पार्टीसाठी सापाचं विष पुरवणाऱ्या एका एजंटकरवी व्यवस्था केली होती, असाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात(Drug cases) गुंतलेला एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत कसा पोहोचला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. “एक ड्रग्ज माफिया, जो सापांचं विष विकतो, रेव्ह पार्टीमध्ये(Rave party) त्याचा वापर करतो, तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर येतो, त्याचं आदरातिथ्य केलं जातं. त्याच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती केली जाते. मला वाटतं महाराष्ट्रात जो ड्रग्जचा व्यापार चालू आहे, त्याची सूत्र सरकारमध्येच तर नाही ना?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “एल्विश यादवसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कुठली माहिती नाहीये का? त्यांच्या बंगल्यावर कोण येतं, कोण जातं यावर नियंत्रण ठेवायला यंत्रणा नाही का? तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात ना? तुमच्याकडे याची माहिती नाही? कुठे गेली तुमची पोलीस यंत्रणा? वर्षा बंगल्यावर एल्विश यादवचं सुपरहिरोप्रमाणे स्वागत केलं जातं. सगळ्यांना त्याचं नाव माहिती आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल माहिती नाही. तो मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो. त्याला त्यांच्या गटाचा एक खासदार घेऊन जातो. तो खासदार स्वत: ड्रग्जचं सेवन करतो”, असा गंभीर दावा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केला.
“एनसीबी(NCB) काय करतेय? ते काही ग्रॅम चरस-गांजा(Charas-marijuana) पकडल्यावर मोठा तीर मारल्याचं नाटक करतात? या व्यक्तीला वर्षा बंगल्यावर कुणी आमंत्रित केलं होतं? मुख्यमंत्र्यांच्या निवासाशी त्याचा काय संबंध आहे? मुख्यमंत्र्यांचं कुटुंब किंवा मुख्यमंत्र्यांचं राजकीय कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का? दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबातले किती आमदार ड्रग्जचं सेवन करतात याची माहिती हवी असेल तर मी देईन”, असाही दावा संजय राऊतांनी यावेळी केला.
दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनाही (Devendra Fadnavis)लक्ष्य केलं. “गृहमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. त्यांचं नेहमीचं वाक्य आहे की ‘मी तोंड उघडलं तर तुमची तोंडं बंद होतील’. आमची तोंडं बंद होणार नाहीत, आधी तुम्ही तोंड उघडा असं मी गृहमंत्र्यांना सांगेन. दिल्लीत एल्विश यादवबरोबर कोण ऊठबस करतं? माझं अमित शाह यांना आव्हान आहे. हा विषय थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचलाय. सरकार काय कारवाई करतंय?” असा प्रश्न राऊतांनी केला आहे. दरम्यान, एल्विश यादवसारख्यांकडून प्रोटेक्शन मनी अर्थात बचाव करण्यासाठी पैसा घेतला जात असल्याचा दावाही राऊतांनी केला. “या सगळ्याला राज्यातले राज्यकर्ते संरक्षण देत आहेत. त्याबदल्यात त्यांना प्रोटेक्शन मनी मिळत आहे. २५-३० वर्षांपूर्वी मुंबईतल्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिम, अबू सालेमला(Abu Salem) प्रोटेक्शन मनी दिलं जात होतं. त्यातून हे माफिया वाढले. आताही ललित पाटीलपासून इतर सर्व ड्रग्ज माफियांकडून प्रोटेक्शन मनी घेतलं जातंय. त्यात या सरकारमधले लोक सामील आहेत. हा आरोप नसून तथ्य आहे”, असं ते म्हणाले.