अमीत शहांच्या मिशन ४५ मध्ये दिग्गज राजकीय घराण्यांची ‘मुले पळविणारी टोळी सक्रीय होणार?; राजकीय वर्तुळात मिश्कील चर्चा!

मुंबई  : राज्यातील सत्ताधारी शिवसेना भाजप सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार,  आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थासह लोकसभा पुणे पोटनिवडणूक तसेच लोकसभा आणि विधानसभा २०२४ साठी भाजपची तयारी या  आणि  अश्या संघटनात्मक बाबीवर  आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah ) शनिवार सायंकाळपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या बैठकीत सर्वात महत्वाचे म्हणजे महाविकास  आघाडीतून नव्याने काही दिग्गज राजकीय घराण्याच्या नेत्यांच्या जनरेशन नेक्स्ट मधील तरुणांना पक्षात प्रवेश देण्याबाबत चर्चा होणार  असल्याचे सांगण्यात येत  आहे. त्या निमित्ताने भाजपमध्ये पुन्हा एकदा राजकीय घराण्यातील नेत्यांची मुले पळविणारी टोली सक्रिय होणार  असल्याची मिश्कील चर्चा रंगली  आहे.

अमित शाह यांनी शनिवारी संध्याकाळी मुंबईत मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह मुंबई  अध्यक्ष  आशिष शेलार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करणार आहेत त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटी ( सुकाणू समिती) सदस्यांची स्वतंत्र बैठकही घेणार आहेत. शनिवारी संध्याकाळी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामी राहणार आहेत. दरम्यान रविवारी अमित शाह यांच्या हस्ते नवी मुंबईत खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी  यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर ते पुन्हा एकदा पक्षाचे नेते, खासदार यांच्याशी चर्चा करतील. यानंतर दुपारी चार वाजता गोव्याला रवाना होतील  असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने तसेच पुणे लोकसभा पोटनिवडणूक आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा दौरा महत्वाचा आहे. २०२४ करीता भाजपमध्ये नवे चेहरे लोकसभा रिंगणात   उतरविण्याचा पक्षाचा मानस असून त्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीत चार पिढ्यापासून निष्ठावंतपणे काम करणा-या नेत्यांच्या घराण्यातील इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाचा मुद्दा महत्वाचा असेल ,  बाळासाहेब थोरात यांचे राजकीय वारस असलेल्या सत्यजित तांबेचे उदाहरण देवून या सूत्रांनी सांगितले की, त्यादृष्टीने पूर्व तयारी आणि पक्षाच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाणार  आहे. २०१४नंतर २०१९ मध्येही भाजपमध्ये अन्य पक्षातील नेत्यांना त्यांच्या मुलाना नातवंडाना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली होती. त्यावेळी पिचड, नाईक निंबाळकर मोहीते पाटील, पाचपुते, गावित, हिरे, निलंगेकर विखेपाटील कर्डिले कोल्हे अश्या दिग्गज राजकीय घराण्यांना भाजपच्या बाजुने करण्यात आले होते. आता मिशन ४५ मध्ये विरोधी बाजूच्या संभाव्य जिंकू शकतील अश्या उमेदवारांना गळाला लावण्याची पध्दत पुन्हा  अंमलात आणायची रण निती तयार केली जात  आहे असे सूत्रांनी सांगितले. योग्यवेळी पक्ष संपर्कात असलेल्या विरोधी बाजूच्या राजकीय नेत्यांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घे  ईल  असे सूचक विधान त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे या सूत्रांनी सांगितले. यावेळी ती प्रकर्षाने ही खेळी राबविली जाणार असून त्याची सुरूवात पुणे लोकसभा पोटनिवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे अशी माहिती जाणकार विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पुण्यात कॉंग्रेस निष्ठावंत राहिलेल्या टिळक आणि गाडगीळ घराण्यातील इच्छुक राजकीय वारसांना भाजपमध्ये येण्याची  ऑफर दिली जाण्याची चर्चा असून त्यात रोहित टिळक, अनंत गाडगीळ या पक्षात नाराज  असलेल्या  आणि  अडगळीत टाकण्यात आलेल्या ब्राम्हण राजकीय नेत्यांच्या वारसांपासून सुरुवात केली जावू शकते, त्याशिवाय माजी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांचे सूपूत्र सत्यजीत देशमुख, पंतंगराव कदम यांचे सुपूत्र विश्वजीत कदम असे पश्चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेस राष्ट्रवादीतील निष्ठांवत नेत्याचे वारसदार यापूर्वीच भाजपच्या वाटेवर  असल्याच्या वावड्या  उठविण्यात  आल्या  आहेत. त्यात राजकीय घराण्यापैकी पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, संग्राम थोपटे, राष्ट्रवादीच्या बारामतीमधील दिग्गज नेत्यांच्या नातवंडापासून सातारा कोल्हापूर आणि सांगली सोलापूर लातूर नांदेड येथील काही कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरातील तरुणाना भाजपमध्ये प्रवेशाची मोहिम हाती घेतली जावू शकते असे या सूत्रांचे मत आहे.

या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की देशात देखील कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मुले भाजपच्या गळाला लावण्याचा कार्यक्रम जोरात कॉंग्रेस नेते ऐके एन्टोनी यांच्या मुलाने नुकताच भाजपात प्रवेश केला असून यापूर्वी जितेंद्र प्रसाद, ज्योतीरादित्य सिधीया, अश्या नेत्यांना प्रवेश देण्यात आला आता दिल्लीत संदिप दिक्षीत, (शिला दिक्षीत यांचे सूपूत्र)  यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू  असून कॉंग्रेस राष्ट्रवादीला भगदाड पाडून महाविकास  आघाडी कमजोर करण्याचा भाजपचा प्लान४५  अस्तित्वात येवू शकेल. त्याबाबत शहा यांनी स्थानिक नेत्यांना कामाला लावले  आहे. अशी माहिती या सूत्रांनी दिली  आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून उद्या रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लोकं येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळायला हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईसह, पनवेलमधील सर्व शाळांना आज नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेनं सुट्टी जाहीर केली आहे.  अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार असल्याने मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईला प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 

 

किशोर  आपटे

राजकीय विश्लेषक

 

मुख्यमंत्र्याकडून भाजप श्रेष्ठींसमोर २०लाख साधकांचे शक्तिप्रदर्शन; आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा !

Social Media