मुंबई : ठाकरे पिता पूत्र गेल्या दहा महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या रेकॉर्डब्रेक सभा घेताना दिसत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने ते ज्या श्री संप्रदयाचे साधक आहेत त्यांच्या गुरूना पुरस्कार देण्याच्या निमित्ताने आपल्या लोकप्रियतचे शक्तिप्रदर्शन करत हम भी किसीसे कम नही दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. या शक्तीप्रदर्शनाचा शिंदे यांना व्यक्तिगत राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात मागील पन्नास वर्षात विनोबा भावे यांच्या नंतर अध्यात्मिक चळवळ उभी राहिली. त्यात स्वाध्याय प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांनी गिता तत्वज्ञानावर प्रवचने करत वेगळी कर्म ज्ञान शक्ती यावर आधारीत अध्यात्मिक चळवळ निर्माण केली. गोव्या पासून गुजरातच्या ओख्यापर्यंत त्यांचा अनुयायी परिवार मोठ्या प्रमाणात नागरी सागरी आणि आगरी समाजात आहे. त्याच वेळी नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधावर प्रवचने करत व्यसनमुक्ती, तंटामुक्त समाज निर्मिती या ध्येयावर आधारीत बैठकांचे आयोजन गावोगावी सुरू केले ही अध्यात्मिक चळवळ ठाणे रायगड जिल्ह्यातील कुणबी समाजात अमुलाग्र लोकप्रिय झाली. त्यानंतर ती राज्यभर पसरली. नानासाहेब यांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ही चळवळ अध्यात्मिक वासरदार म्हणून पुढे नेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या टिळाधारी संप्रदायाचे साधक असून ते धर्माधिकारी यांना अध्यात्मिक गुरू मानतात. नवी मुंबईच्या खारघरमधील सेंट्रल पार्क मैदान येथे भव्य अशा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात. महाराष्ट्र भूषण २०२२ हा पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील सरकारमधील जवळपास सर्व महत्वाचे सर्वच नेते, मंत्री यावेळी उपस्थित राहतील. खास या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन नवी मुंबईत केले जात आहे. एवढ्या भव्य दिव्य महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या आयोजनातून मुख्यमंत्र्यानी राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याचे ,मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील दहा महिन्यात शिवसेना पक्षांची वाताहात करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील ठाकरे पिता पूत्रांच्या सभांची गर्दी कमी होण्या ऐवजी वाढली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्याना शिवसेनेचा मुख्य नेत्या सह मुख्यमंत्र्याची भुमिका देवूनही त्यांच्या सभाना माणसे निघून जातानाची दृश्ये माध्यमात दाखविली गेली. त्यामुळे आपल्यामागे मोठ्या प्रमाणात समाज आणि गर्दी आहे आपली लोकप्रियता देखील कमी नाही हे दाखवून देण्याची संधी या पुरस्कार सोहळ्यातून साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यासाठी खारघरमधल्या सेंट्रल पार्कच्या मैदानावर ४०० एकर परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार होणार आहे. समाज प्रबोधन, अध्यात्म, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला आहे. त्यामुळे जवळपास २० लाख श्री सदस्य अनुयायी आणि सर्व सामान्य लोक या कार्यक्रमाला या मैदानावर उपस्थित राहतील त्या पार्श्वभूमीवर तयारी राज्य सरकारच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे हा महाराष्ट्र भूषण सोहळा आतापर्यंत सर्वात मोठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. शिवाय या कार्यक्रमाची जबाबदारी उदय सामंत, शंभूराज देसाई आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांवर दिली आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण कोकणातील लाखो श्री सदस्य त्यासोबतच त्यांना मानणारा वर्ग खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर येणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुका असतील किंवा मग लोकसभेच्या निवडणुका मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वात दोन्ही पक्षांना कोकणात ताकद वाढवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून गृहमंत्र्यांसमोर एक मोठा जनसमुदाय या कार्यक्रमाच्या निमित्त पाहताना शिंदे यांचे राजकीय महत्व अधोरेखीत होणार आहे. त्यामध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आप्पासाहेब अध्यात्मिक गुरु तर देवेंद्र फडणवीस यांचे चांगले स्नेही आहेत. लाखो अनुयायांनी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणाऱ्या लोकांनी हे मैदान भरुन जाण्यामागे राजकीय फायद्याचा विचार दोन्ही पक्षानी विचार केला मात्र निवडणुकांमध्येच हा फायदा दिसून येईल का हे केवळ श्री च जाणो.
किशोर आपटे
राजकीय विश्लेषक