मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Acharya Balshastri Jambhekar)पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल आणि या योजनेसाठीच्या अटी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सन २०२१ आणि २०२२ चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी महासंचालक हेमराज बागुल यांच्यासह विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव यांची उपस्थिती होती.
शासकीय योजनांच्या प्रगतीची, राज्याच्या विकासाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विकास योजना, त्यांची अंमलबजावणी, या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ही भूमिका जबाबदारीने पार पाडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पुरस्कार देऊन मान्यता देणे आवश्यक आहे.
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे पुनर्गठन तसेच अधिस्वीकृती समितीचा लवकरात लवकर शासन निर्णय काढला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. बदलत्या काळानुसार स्वरूप बदलत आहे. प्रिंट माध्यमांचे महत्त्व कमी झाले नसल्याचे सांगून इलेक्ट्रॉनिक माध्यमांचेही महत्त्व आहे. आता समाज माध्यम दुधारी तलवारीसारखे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ते विविध विषयाला वाचा फोडत आहे. पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी जे शक्य आहे ते करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर( Kumar Ketkar) यांना जाहीर झालेला सन २०२१ चा कृ.पां. सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार केतकर यांच्या अनुपस्थितीत अनिकेत जोशी यांनी स्वीकारला. सन २०२२ चा ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देवून पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. यामध्ये सन २०२१ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै. बीड रिपोर्टर, बीडचे शेख रिजवान शेख खलील, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) न्युज १८ लोकमत, मुंबईचे विलास बडे, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.भास्कर, मुंबईचे विनोद यादव यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर सन २०२२ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै.पुण्यनगरी, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम )ब्युरो चिफ साम टिव्ही मुंबई च्या रश्मी पुराणिक, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.पुण्यनगरी मुंबईचे किशोर आपटे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पुरो यांनी केले. सूत्रसंचालन रिताली तपासे आणि राजेंद्र हुंजे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष महेश पवार यांनी मानले