अदानी!, अडाणी, आणि अनाडी! ; अजित पवारांच्या वक्तव्यातून ‘बुंद से गयी. . .!’

विधानसभा निवडणूक २०२४च्या जाहीर प्रचाराचे शेवटचे चार-पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. गावोगाव फिरणा-या पत्रकार मिंत्रानी एकमेकांशी चर्चा करताना बरीच माहिती दिली-घेतली जात आहे. त्यातून एका मित्राने केलेल्या चर्चेचा हा सांराश:

मित्र म्हणाला, सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पैशांचा महापूर आलेला दिसत आहे. केवळ पंधरा दिवसांत निवडणूक आयोगानेच पाचशे कोटी पेक्षा जास्त रोख रक्कम पकडली आहे. असे सांगण्यात येते की पकडण्यात आलेली ही रक्कम केवळ पाच ते दहा टक्के आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात निवडणूकीत मुक्तपणे पैशाचा वापर, आणि वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा चोरपावलांनी होत आहे.

मी म्हटले, या सा-यामध्ये चिंता करण्यासारखे काय आहे? हे तर नेहमीच होते. मित्र म्हणाला तसे नाही, असे म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. नाही हे नेहमीसारखे होत नाही. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा, मिडिया, जाहीरात कंपन्यांपासून सर्वकाही ज्याचा उल्लेख येथे करणे शक्य नाही अश्या सर्व गोष्टी पैश्याने खरेदी केल्या आणि निवडणूक जिंकण्यासाठी कामी लावल्या गेल्या आहेत. शहरातील लॉज, हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने,पब, आणि विरंगुळ्याच्या ठिकाणी रात्री उशीरानंतर (दहा नंतर) देखील वर्दळ वाढली आहे. सध्या त्यांच्यासाठी हा म्हणे धंद्याचा सिझन आहे! तळीरामांची तर सध्या चलती आहे, आणि कुणा नेत्यांची, पक्षांची, गटा-तटांची ‘तळी उचलून प्रचारात फिरणा-या तळीरामांचा’ तर हा दर निवडणूकीचा ‘हंगामी खानदानी धंदाच’ आहे!.

 

ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्स तसेच सभा-मेळावे यांचे आयोजन करणारे, कॅटरिंग आणि भाड्याने सामान देणारे यांच्याकडेही लगीनघाईपेक्षा जास्त सध्या हातघाई आहे. या धंद्यात त्यांच्यासाठी काही प्रमाणात ‘अच्छे दिन’ आले आहेत. माणसांची ‘आवक जावक’ करणा-या दलालांची देखील या काळात चलती आहे. सातशे रूपये दिवसांचा भाव ठरवायचा पाचशे आगावू द्यायचे सभा, मेळावे पदयात्रांना माणसे पुरवायचा हा धंदा याच काळात जोरात केला जात आहे.मित्र सांगत राहिला मी दंग होवून ऐकताना विचार केला.

ज्या देशात ८५लाख लोकांना सरकारी फुकटच्या धान्याची गरज पडते, हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले आहे. जे पिक हाती आले आहे त्याच्या काढणीला जेवढा पैसा लागणार आहे त्यापेक्षा त्याला मिळणारा भाव परवडणारा नाही, बँकांचे कर्ज डोक्यावर आहे आणि रोजच्या खर्चाची काहीच सोय नाही, जेथे बेरोजगारी, महागाई या मुद्यांवर निवडणूकीत घोषणा दिल्या जातात, त्याच देशात राज्यात हे वास्तव त्याहून भयाण आहे. त्यामुळे सध्या निवडणूक ‘हंगाम’ आणि ‘हंगामा’ आहे. या सगळ्यातून पुढे जावून आजच्या मुख्य मुद्याकडे वळूया. मित्र सांगत होता,  या टिपेच्या निवडणूकीतील विसंगती दररोज समोर येताना दिसत आहेत. सध्या निवडणूक आयोग ही यंत्रणा केवळ बुजगावणे आहे की काय? अशी स्थिती असल्याचे जाणकारांच्या टिका-टिपणीतून विचारले जात आहे. देशात निवडणूका घेणे ही केवळ औपचारिकता राहिली असून त्यात अनेक चुकीच्या प्रथा-पायंडे आणि भ्रष्ट गोष्टी उघडपणे राजरोस केल्या जात असून कायदा, घटना, आचारसंहिता यांचा केवळ बागुलबुवा तयार केला जात असून प्रत्यक्षात ‘सत्ताधा-यांच्या बटिक’ होवून यंत्रणा काम करत आहेत की काय? असे हे वास्तव आहे असे या क्षेत्रात कार्यरत संवेदनशील लोकांचे निरिक्षण आहे असे सांगण्यात येत आहे असे मित्र म्हणाला.

या निवडणूकीत सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावर निवडणूक झाल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार? याची चर्चा केली जाते, आणि प्रामुख्याने भाजपला कसेही करून पुन्हा मुख्यमंत्रीपद हवेच आहे हे त्यांच्याच नेत्यांनी जाहीर केल्याने लपून राहिलेले नाही. त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात सध्या या निवडणूका होत आहेत ते एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. त्यांच्या या अस्वस्थतेचे महत्वाचे दुसरे कारण हे आहे की, त्यांच्या सकट महाराष्ट्रात केंद्रातून येणा-या भाजपच्या नेत्यांच्या सभांकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. रिकाम्या खुर्च्या माध्यमांनी दाखवू नयेत अशी सक्त ताकिद दिली जात आहे म्हणे!

त्यामुळेच मोदी आणि शहांच्या सभांमध्ये सध्या शरद पवारांवर अजूनही कोणत्याही प्रकारची थेट आरोप टिका टिपणी केल्याचे दिसत नाही. पण म्हणूनच पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठी एका पक्षांच्या अध्यक्षांची खास नेमणूक यावेळी करण्यात आली आहे म्हणे. ते सगळ्या मुलाखती, सभांमध्ये पवार-ठाकरेंच्या नावाचा उध्दार करत फिरत आहेत. काय काय सुविधा उपलब्ध होवू शकतात ना? निवडणूकांसाठी? मी आश्चर्याने मित्राला प्रश्न केला.

तो म्हणाला, सत्ताधारी पक्षाला कश्याही प्रकारे १४५ जागांवर भोज्जा करायचा आहे. आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीत जागा शंभर- सव्वाशेच्या पलिकडे जात नसल्याचे दिसत आहे असा अहवाल असल्याचे सांगण्यात येत आहे! शरद पवारांवर थेट टिका भाजपचे नेते करत नसले तरी त्यांचा सारा भर आता मतांचे ध्रुवीकरण हिंदू मुसलमान करून जास्तीच्या जागा मिळवण्याकडे असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महा आघाडीच्या जागा कमी होण्यास हातभार लागेल पण त्याचवेळी त्यांच्या महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाची स्थिती या प्रचारामुळे अजून नाजूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे तीन-चार मुस्लिम उमेदवार भाजप सोबत महायुतीत राहून मैदानात उतरण्याचा धोका पत्करलेल्या अजित पवार यांना दुसरीकडे एकट्याने काका शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत टिका हल्लाबोल करावा लागत आहे. तो देखील जपून करावा लागणार आहे याचे भान असूनही काही वेळा त्यांच्याकडून ‘नोबॉल वक्तव्ये’ देखील समोर येत आहेत. अश्या कात्रीत महायुतीचे दोन्ही महत्वाचे ‘भाजपचे साथी’ सापडले आहेत.

त्यातच चांदिवली येथे मुख्यमंत्र्याचा ताफा जात असताना कॉंग्रेस कार्यालयासमोर, उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून ‘गद्दार’ अश्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्याकडून ताफा थांबवून कॉंग्रेस कार्यालयात धाव घेत जावून ‘तुम्हाला हेच शिकवले जाते का? असा जाब विचारण्यात आला म्हणे!. मुख्यमंत्री अचानक कार्यालयात आल्यानंतरही तेथे उपस्थितांनी त्यांचा यथोचित सन्मान केला नाही, कुणी उठून उभे राहात आदर दाखविला नाही, म्हणून मुख्यमंत्री अधिकच चिडले. त्यांच्या कडच्या पोलीसांनी नारे देणा-यांना ताब्यात घेतले. मात्र या प्रसंगातून मुंबई महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची भाजपने काय स्थिती केली आहे? याचे उदाहरण समोर येत आहे.

 

तर दुसरीकडे बारामतीमध्ये पराभवाच्या छायेत असलेल्या अजित पवार यांचा देखील असा मजबूरी का नाम . . .  होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून एका वृत्तसंस्थेच्या इंग्रजी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये २०१९मध्ये सत्तास्थापनेसाठी उद्योगपती ‘अदानींच्या घरी बैठका’ झाल्याचा आणि त्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह फडणवीस आणि शरद पवारही हजर असल्याचा उल्लेख आला. त्याने सा-या देशात खळबळ माजली. सा-या माध्यमांना मोठे खाद्य मिळाले. पण चार दिवस झाले तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात असूनही अजित पवारांच्या या वक्तव्यांचा खुलासा केला नाही, की फडणवीस काही बोलले नाहीत. मग हळूच अजित पवारांकडून ‘अदानी बैठकीत’ नव्हते असे म्हणून ‘यू टर्न’चा प्रयत्नही झाला. मात्र बुंद से गयी वो…  या म्हणी प्रमाणे त्यांना काय म्हणायचे होते? ते समोर आले आहे. शरद पवार यांनी मात्र अजित पवारांच्या या आरोपातून एका भाषणात स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. सत्ताधारी नेत्यांकडे उद्योगपतींचे संबध असणे काही गैर बाब नाही, मी टाटा, किर्लोस्करांच्या काळापासून अनेकांच्या कायम संपर्कात असतो असे सांगून काका निसटले आहेत!

त्यातच महाराष्ट्रात राहूल गांधी आणि उध्दव ठाकरे उघडपणे अदानीच्या विरोधात भुमिका मांडत राहिले आहेत. धारावीचा विकास करण्यासाठी त्या बदल्यात अदानी यांना आजुबाजूच्या केंद्र राज्य सरकारच्या ताब्यातील अनेक भुखंडासह मुंबईतील मोक्याच्या जागी असलेल्या १२ आणखी भुखंडाचा सौदा करण्यात आला आहे. एका अर्थाने सा-या मुंबईचा ‘रियल इस्टेट’ व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी यंत्रणा अदानीच्या कब्जात गेली आहे. राज्य सरकार देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, त्यांना शासकीय जागांमधून त्यांच्या विकासहक्कांच्या मोबदल्यातून पैसा उभारण्याची गरज पडण्याची शक्यता आहे. कारण नव्याने कर्ज घेण्यासाठी नियमावलींमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे, अशी स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. डिसेंबर महिन्याचा खर्च भागविण्यासाठी राज्य सरकारला रिझर्व बँकेकडून उचल ओवरड्राफ्ट घ्यावा लागला आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील महसूल खात्या अंतर्गत असलेल्या जमिनींच्या सात-बारावर केंव्हाही अदानी चे नाव लागण्याची भिती उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता का हवी आहे? यामागचे हेच कारण आहे की भाजप सत्तेवर आली तरच अदानीसाठी ते फायद्याचे असेल असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. असे मित्र म्हणाला.

मित्र पुढे म्हणाला की, काही जाणकारांच्या मते अदानी यांच्या वरदहस्तामुळेच हरियाणात शेवटच्या क्षणी वीस मतदारसंघातील निकाल बदलण्यात आले, आणि हारता हारता भाजप जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयात वीस जागांवरील उमेदवारांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून ‘फेरमोजणी केली जात नसल्याच्या याचिका’ धूळ खात पडल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात धारावीसह रियल इस्टेट व्यवसाय, बंदरे, खानिकर्म, ऊर्जा, उद्योग आणि शेअर बाजार अश्या सर्वच प्रकारच्या मोट्या प्रमाणात असलेल्या आर्थिक संपदेवर कोणा ‘कॉर्पोरेट धन्नासेठ’चा थेट हस्तक्षेप होण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्यासाठी सा-या यंत्रणांवर ‘लक्ष्मीदर्शन योजने’चे वजन मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे! असे मित्र म्हणाला.

अजित पवार यांनी कळत-नकळत खूप मोठा धोका पत्करून त्याची वाच्यता केली आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा’ या सेनापती बापट यांच्या ओळींची आठवण ठेवून मतदारांनी जागे रहायला हवे. झारखंडमध्ये खाण उद्योगांमुळेच अदानीचा डाव सुरू आहे, तीच गोष्ट महाराष्ट्रात आहे, हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक ही एक ‘स्टडी केस’, ‘प्रयोगशाळा’ झाला आहे त्याचा ‘मुख्य खेळ’ आता ‘झारखंड आणि महाराष्ट्रात’ होण्याची शक्यता आहे अशी भिती या मित्राने बोलताना व्यक्त केली.

मित्रानो, हे सारे जर खरेच असेल तर, ‘अदानी’ तर समोर (अजीत पवारांच्या वक्तव्यातून) आला आहेच, आपल्याला ठरवायला हवे की आताही आपण ‘आडाणी’च राहायचे आहे? की ‘अनाडीपणा’ करून दुर्लक्ष करत या सा-या गंभीर वास्तवाकडे डोळेझाक करायची आहे? हे आपणच ठरवायला हवे. नाही का?

 

निवडणूक विशेष

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

खऱ्या मराठी अस्मितेसाठी ‘शिंदे-फडणवीसांच्या’ इतिहासाची चाड ठेवून जागरूकपणे मतदान करावे.! : एका चर्चेचा गोषवारा!

Social Media