उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकथॉन(Agricultural Hackathon)च्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी देण्याबरोबरच राज्यातील कृषीक्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या विधानभवनातील समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिल्या ॲग्रीहॅकॅथॉन स्पर्धेच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, प्रधान सचिव (व्यय) सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), कृषी आयुक्त सुरज मांढरे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संशोधक, तज्ज्ञ उपस्थित होते.
‘अॅग्री हॅकॅथॉन’द्वारे राज्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती घडेल;नवकल्पक संशोधकांना संधी मिळून कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाची अर्थव्यवस्थेचा कृषी आणि कृषीपुरक उद्योगावर आधारीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘अॅग्री हॅकॅथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वतशेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आणि जैविक खतांचे वैज्ञानिक उपयोग, शेतमालाची विक्रीसाखळी सुधारण्यासाठी ई-मार्केटिंग आदी उपाय करण्यात येणार आहेत. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्य सरकारच्या पुढाकारामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषी हॅकॅथॉनद्वारे नवकल्पक संशोधनाला संधी मिळेल. महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राला नवी दिशा मिळेल. या हॅकॅथॉनच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये स्मार्ट शेती, हवामान अंदाजप्रणाली, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान, आणि शाश्वत कृषी उपायांसाठी नवनवीन संकल्पना मांडल्या जाणार आहेत. ‘हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल, यशस्वी संकल्पनांना पुढे नेण्यासाठी वित्तीय व तांत्रिक मदत देखील दिली जाणार आहे. खाजगी कंपन्यांचे सहकार्य घेऊन शासनाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील(Agriculture sector) समस्यांवर आधुनिक आणि तांत्रिक उपाय शोधण्याच्या दृष्टीने कृषी हॅकॅथॉन (Agricultural-Hackathon)एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.