विधानसभेची महा निवडणूक २० नोव्हे.२४ जस जशी जवळ येत आहे तस तसे या निवडणूकीच्या बहुआयामी पैलूंचे नवे पदर उलगडत आहेत. आता तर निवडणूकीचा मुख्य काळ प्रचाराचा काळ दिवाळीनंतर सुरू होत आहे सुमारे १६ ते १८ दिवसांचा हा काळ आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांच्या आतिषबाजीचा राहणार आहे. त्यात आपल्याला आपल्या नेत्यांच्या साधनशुचित्व आणि जनकल्याणाच्या कळवळ्याचे नेहमीपेक्षा उत्कटपणे दर्शन होणारच आहे. त्यापूर्वी सांगलीमधील तासगाव येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी जी काही गतकाळाच्या घटनांचा हवाला देत मुक्ताफळे उधळली आहेत. त्यात त्यांनी ‘एका दगडात अनेक पक्षी मारण्या’चा प्रयत्न करताना आपल्या आणि मित्रपक्षाच्या ‘पायावर धोंडा पाडून घेतला’ आहे म्हणे.
यावर भाष्य करण्यापूर्वी येथे एक डिस्क्लेमर दिला पाहिजे. दादा जे काही बोलले म्हणून आपण त्यांना दोष देतो किंवा तारीफ करतो ते दादा बोलतच नाही म्हणे, अलिकडे ‘नरेश अरोरा’ त्यांच्याकडून सारे काही करवून, वदवून आणि करुन घेत असतात म्हणे! पण त्याचा भला बुरा जो काही इम्पँक्ट आहे तो दादांना भोगावा लागणार आहे, नव्हे त्यासाठीच त्यांनी अरोराना भली मोठी बिदागी अर्पण केली आहे म्हणे! तर असो.
दादांच्या भाषणात महायुती सरकार लाडकी बहिण वगैरे सारे होतेच पण क्लायमॅक्स तर जेंव्हा त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांनी दोनदा पाणी प्यायले तेंव्हा होता! (त्याची ऍक्शन रिप्ले नंतर मोठ्या साहेबांनी देखील करून दाखवली आणि अरोराला बिदागी न देता भाव खावून गेले की नाही तर असो.) ते म्हणाले की गृहमंत्री म्हणून आर आर पाटील यांनी त्यांच्या कथित सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फाईलवर (नस्ती) सही केल्याने केसाने गळा कापला होता वगैरे. आणि ही गोष्ट जेंव्हा फडणवीस २०१४मध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी बोलावून, बाजुला बसवून दाखवली म्हणे!
अजित दादांना यातून सूचवायचे वेगळेच होते, पण तसे झालेच नाही आणि नको त्या गोष्टी उकरून त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे असे आता मानले जात आहे. दादांना यातून हे सूचवायचे होते की, गृहमंत्री आबा पाटील यांनी त्यांची चौकशी मोठ्या पवार साहेबांच्या परवानगी शिवाय लावली नाही, नव्हे किंबहुना त्यांच्या सूचनेवरूनच लावली होती. युगेंद्र पवारांना रिंगणात आणून मोठ्या पवारांनी घर फोडले म्हणायचे का? अजीत पवार आणि श्रीनिवास पवार यांच्या आईने नको म्हटले तरी, जी चूक मी लोकसभेत केली तीच त्यांनी आता केली आहे असे जे अजित पवार बोलले त्याचा असा सगळा हा संदर्भ आहे.
त्यावर लागलीच शरद पवारांनी ‘मी माझेच घर कधीही फोडले नाही’ असे नेमके उत्तर देत अजित पवारांनी स्वत:चे घर फोडल्याचे सुचवले आहे, तर युगेंद्र पवारांच्या मातोश्री आणि अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी त्यांच्या सासूबाईनी लोकसभेला सुनेत्रा वहिनींना सुप्रिया समोर उभे करतानाही ‘असे करु नका’ म्हटले होते तेंव्हा ते ‘दादांनी का ऐकले नाही?’ असा सवाल केला आहे. त्यावर अजित दादांनी आधीच खुलासा केला आहे की, त्यावेळी ‘माझी चूक झाली म्हणून मी आधीच कबुली दिली’ आहे. त्यावर आता बारामतीच्या जनतेच्या हितासाठी मोठ्या ‘पवार साहेबांनी त्यांचे विचार पुढे घेवून जाणारा उमेदवार म्हणून पवार घराण्याचा ज्येष्ठ कुटूंबप्रमुख म्हणून युगेंद्रला संधी’ दिल्याने आता त्यावर घरात कुणाला आक्षेप नसल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे. म्हणजे काकांनीच घर फोडले म्हणायचे का? या कौटुंबिक प्रश्नाला उत्तर मिळाले आहे.
राहिली गोष्ट आर आर पाटील यांच्याकडून सही करण्याची, तर त्यावेळी नंतर त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सही होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने २०१४च्या निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. अजित पवार यांना नंतर २०१४ मध्ये तेंव्हा वानखेडे मैदानावर पद आणि गोपनियतेची शपथ घेवून मुख्यमंत्री झालेल्या फडणवीस यांनी ती फाईल घरी बोलावून जवळ बसवून दाखवली म्हणे! ज्यांच्यावर ७० हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत, अश्या माजी मंत्र्याना मुख्यमंत्री अश्या प्रकारे गोपनीय फाईल दाखवत असतील तर तो पद आणि गोपनीयतेचा भंग आहे, त्याबद्दल राज्यपालांनी फडणवीस यांच्यावर कारवाईच केली पाहिजे असे आता फडणवीस यांचे विरोधीपक्षांतील मित्र खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे दादांनी बोलून उगाच फडणवीस यांना गोत्यात आणले आहे! शिवाय पवार साहेबांनीच त्यांची सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांच्या माध्यमातून लावली हे स्पष्टपणे सांगायचे असताना ते तसे सांगू शकले नाहीत.
खरेतर या प्रकरणात नागपूर खंडपीठात याचिका होती, या घोटाळ्याबाबत सरकारची भुमिका काय? असे न्यायालयाने म्हटले तेंव्हा ‘आम्ही चौकशी करतो’ असे सरकारला म्हणावे लागले होते, त्याची काहीतरी कार्यवाही करायची दाखवावी लागणार म्हणून मग गृहखात्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अंतर्गत अशी चौकशी करण्याचे आदेश देणारी फाईल तयार केली आणि मुख्यमंत्र्याना पाठवली होती. अजित पवार यांना कह्यात ठेवण्यासाठी ही मोठ्या साहेबांची पक्षांतर्गत दबावतंत्राची खेळी होती म्हणे. पण नंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस यांनी चलाखीने त्यावर सही करत चोरावर मोर झाले, आणि ‘मी नाही बा’, तुमच्याच आबांची फाईल होती’ अशी चतुराई करत ती दादांच्या म्हणण्यानुसार दाखवली असावी! असे जाणकार सांगतात. त्यामुळेच २०१३मध्ये भोपाळ येथे नरेद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केल्याबरोबर ४८ तासांत राष्ट्रवादीच्या आमदारांचे धरण फुटले आणि ४२ आमदार वाहून जात भाजपसोबत जावून बसले!
अजित पवारांच्या आरोपांनतर यावर आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित यांनी उत्तर देताना ‘आबा असते तर त्यांनी भाष्य केले असते, मी यावर बोलणे योग्य होणार नाही’ म्हणत आब राखली आहे. मात्र ‘कर नाही त्याला डर कसली’ असे म्हणत आबांची आठवण यावी असे एका वाक्यात उत्तरही देवून टाकले आहे.खरेतर दोन आबा आणि एका बाबांच्या मध्ये शरद पवारांकडून अजित पवार(Ajit Pawar) यांना काबूत ठेवण्यासाठी केलेल्या या सिंचन घोटाळा अध्यायाची इतिश्री अखेर २०२३मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीत झाली हे आता स्पष्ट झाले आहे. बहुदा अजित पवार यांनी जवळपास दहा वर्षांची ही सल बोलून दाखवत आता ‘निवडणुकीनंतर परतीसाठी तयारी केल्याचे हे संकेत’ मानले जात आहेत.
२००१ ते २०१० अश्या दहा वर्षात सिंचनावर प्रमा (प्रशासकीय मान्यता) आणि सुप्रमांच्या (सुधारीत प्रशासकीय मान्यता) माध्यमांतून वारेमाप खर्च झाला मात्र केवळ १ टक्काच सिंचन वाढले, असे कॅगच्या अहवालाचा हवाला देत त्यावेळी विधानसभेत सांगोल्याचे शेकापचे आमदार आबासाहेब (गणपतराव) देशमुख यांनी सर्वप्रथम अजित पवार (Ajit Pawar)यांना अडचणीत आणले होते, त्यावेळी विधानपरिषदेत बि टी देशमुख यांनी मागास विभागांच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा लावून धरला होताच. त्यानंतर विरोधीपक्षात असलेल्या खडसे, महाजन, फडणवीस(Fadnavis) यांनी विषय इतका लावून धरला की अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना सभागृहात भाषण करणे मुश्कील करून टाकले होते. मग गृहमंत्री असणारे दुसरे ‘आबा’ आणि मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज ‘बाबा’ हे सारे ऐतिहासिक संदर्भ या लेखात सुरूवातीला आले आहेत. तर अश्या प्रकारे जेथून अजित पवारांना घरातून पक्षातून बाहेर जावे लागले तेथे ते पुन्हा परतले आहेत, म्हणजे निवडणूकीत मनासारख्या जागा मिळाल्या नाहीत पद सत्ता मिळाली नाहीतर मी चूकलो म्हणत, काकांना तुम्ही तरी असे का वागलात असेही विचारून घेतले आहे. अजित दादांच्या परतीच्या प्रवासाची ही सुरूवात म्हणायची काय? ते येणारा दोन महिन्यांचा काळच ठरवेल, तूर्तास इतुकेच!
हेही वाचा -बंडखोरी : मतदारांच्या आशा आकांक्षा नव्हे, नेत्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाचे भेसूर आणि भयावह दर्शन घडविणारी निवडणूक!
किशोर आपटे
(अधिस्वीकृती धारक पत्रकार, राजकीय लेखक विश्लेषक)