नांदेड : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी ‘लाडकी बहीण योजना’ संदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. या योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असून, भविष्यात ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. मात्र, सरकारच्या आर्थिक स्थितीमुळे हे आश्वासन अद्याप पूर्ण करता आलेले नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
नांदेडमधील एका सभेत बोलताना अर्थमंत्री म्हणाले, “मी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पण, राज्याच्या १३ कोटी लोकांचा हिशोब लावताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. शेतकरी, कामगार, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांसाठीच्या योजनांसह सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे. सगळी सोंग करता येतात, पण पैशांची सोंग करता येत नाही.”
त्यांनी योजना चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करताना सरकारच्या आर्थिक शिस्तीवर भर दिला. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बँकांद्वारे कर्जसुविधा उपलब्ध करून देण्याचा नवीन उपाय सरकारने आणला आहे, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत २० महिला एकत्र येऊन १० लाख रुपये कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
‘लाडकी बहीण योजना'(Ladki-Bahin-Yojana) देशभरात चर्चेत आहे आणि आतापर्यंत अडीच कोटी महिलांना यातून लाभ मिळाला आहे. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, योजना चालू ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यास महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात येईल.