मुंबई : (किशोर आपटे) : राज्य भारतीय जनता पक्षात नव्या फेरबदलांचे वारे वाहत असून निम्म्याहून अधिक जिल्हाध्यक्षांकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राव्दारे अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याची मागणी केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. या जिल्हाध्यक्षांकडून पक्षाला स्पष्टपणे कळविण्यात आले आहे की अजित पवार यांच्यासोबत पक्षाने विधानसभा निवडणूक लढल्यास पक्षाची पिछेहाट होण्याची दाट शक्यता असून त्यानंतर त्याचा दोष जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेते यांना देवू नये.
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार भाजपमध्ये जुना ओबीसी मतदार कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जाण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषासोबतच पक्षाला ह्क्काच्या ओबीसी समाजाची देखील नाराजी ओढवून घ्यावी लागली होती. त्यामुळे लोकसभेत घटलेल्या चार टक्के मतांची पूर्तता करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील सवलती आणि योजनांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करण्याबाबत पक्षाने जिल्हापातळीवर आदेश दिले आहेत. लोकसभेत दूरावलेल्या महिला शेतकरी बेरोजगार युवक आणि ज्येष्ठ नागरीकांना शेतीपंप वीज बिल माफी,लाडकी बहिण योजना बेरोजगारांना मासिक अनुदान आणि ज्येष्टाना तिर्थयात्रा योजना जाहीर करण्यात आली मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाकडून या योजनांचे षेय घेण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपच्या गोटात त्यामुळे अस्वस्थता आहे.
मुख्यमंत्री शिंदे(Shinde) आणि उपमुख्यमंत्री पवार(Pawar) यांच्याकडून अर्थसंकल्पाचे श्रेय घेतले जात असल्याने आता शेतीपंपाची वीजबिल माफीची जोरदार प्रसिध्दी करत ऊर्जामंत्री फडणवीस यांना त्याचे श्रेय देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र अर्थसंकल्पात या योजना जाहीर करणा-या अजित पवार यांच्या पक्षासोबत भाजपच्या मतदारांसमोर गेल्यास पक्षाला फायदा होणार नसून तोटा होणार असल्याच्या पक्षाच्या जिल्हा कार्यकर्त्याच्या मागणीला आता हायकमांडसमोर मांडण्याची भुमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे असे सांगण्यात येत आहे. येत्या आठवड्यात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमीत शहा महाराष्ट्रात निवडणूक तयारीसाठी बैठका घेणार असून त्यात पक्षांतर्गत फेरबदल आणि रण निती यावर चर्चा होणार आहे. त्यात भाजपला एकला चलो च्या ना-याची शक्यता असून तसे झाल्यास पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.