मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) लवकरच ‘पुष्पा 2: द रुल’ मधून धमाका करणार आहे. ‘पुष्पा, फायर समझे क्या वाईल्ड फ्लावर हैं मैं’ हा त्याचा डायलॉग सध्या खूप गाजतोय. अल्लू अर्जुन आणि रश्मिका अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. कालच सिनेमाची टीम मुंबईत आली होती. इथेही जोरदार प्रमोशन झालं. यावेळी अल्लू अर्जुनने एकेकाळी हिंदी सिनेमा करणार नाही असा निर्णय घेतल्याचा खुलासा केला.
‘पुष्पा २’ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन सिनेमाचे संगीतकार देवी श्री यांच्याविषयी म्हणाला, “या सिनेमासाठी देवी श्री यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्ही दोघंही चेन्नईचे आहोत. मी त्यांना एकदा म्हटलं की माझ्यासाठी हिंदी सिनेमा करणं खूप कठीण आहे. पण संगीतकार म्हणून तुमच्यासाठी हिंदीत काम करणं सोपं आहे.”
तो पुढे म्हणाला, “मी त्यांना विचारलं की तुम्ही हिंदीत अजून काम का केलं नाही? तर ते म्हणाले नाही, तूच एक हिंदी सिनेमा कर आणि मी तुझ्यासोबतच त्यात काम करेन. यावर मी म्हणालो मी हिंदी सिनेमा करणार नाही कारण त्यावेळी हिंदी सिनेमात काम करणं खूप मोठी गोष्ट होती. कदाचित मी आयुष्यात एक किंवा दोन हिंदी सिनेमे करेन. आमच्यासाठी हिंदी सिनेमा करणं खूपच लांबची गोष्ट होती. एक त्यावेळची गोष्ट आहे आणि एक आजची गोष्ट आहे. आज आम्ही तुमच्यासमोर येऊन उभे आहोत हे फारच अद्भूत आहे. आम्ही त्याच सिनेमासाठी दोघांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि राष्ट्रीय सुपरहिट अल्बम दिला. ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.”
‘पुष्पा 2: द रुल’ ५ डिसेंबर रोजी संपूर्ण देशभरात रिलीज होत आहे. सिनेमाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा 2’ मधील आयटम साँग ‘Kissik’ प्रदर्शित