मुंबई : देशात व राज्यात काँग्रेसने अनेकवेळा चढ-उतार बघितले आहेत. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस मजबूत होत आहे. गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत मनामध्ये असलेल्या मतभेदांना संपवून टाका आणि एकजुटीने आगामी काळात होणाऱ्या औरंगाबादसह सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने औरंगाबादचे संपर्कमंत्री, व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीसाठी आज गांधी भवन येथे औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन आमदार राजेश राठोड, आमदार धीरज देशमुख, माजी आमदार एम. एम. शेख, माजीमंत्री अनिल पटेल, प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदिया, मागासवर्गीय विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, शहराध्यक्ष हिमेश उस्मानी, माजी आमदार नामदेव पवार, निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक दादासाहेब मुंडे, माजी महापौर अशोक सायन्ना, माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण, महिला अध्यक्ष सीमाताई थोरात, श्रीमती पानखडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
औरंगाबाद महापालिकेसाठी ११५ जागा आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे वार्ड आरक्षित आहेत. देशमुख यांनी या वार्डातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षात काम करत असलेल्या युवक काँग्रेस, सेवादल, अल्पसंख्यांक आघाडी, मागासवर्गीय विभाग, एनएसयुआय, इंटक, असंघटित कामगार आघाडी, महिला आघाडी, किसान आघाडी या सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहराध्यक्ष उस्मानी यांनी निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका विषद केली. जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांनी औरंगाबाद शहरात सामाजिक समिकरणाबरोबरच सरकारच्या ध्येयधोरणांची चर्चा अधिक करावी लागेल हे नमूद केले. अनिल पटेल यांनी संघटित काम केल्यास काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत यश मिळेल असे सांगत विलासराव देशमुख यांचा विचार अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार आहे तोच विचार घेत वाटचाल करणारे अमित देशमुख हे योग्य नेतृत्व करतील असे सांगत अशोक सायन्ना, इब्राहिम पठाण, जितेंद्र देहाडे,एम एम शेख, नामदेव पवार, राजेश राठोड यांनी आपले विचार व्यक्त केले. संघटनात्मक बाबतीत पक्ष जो निर्णय घेईल तिथे काम करण्याची माझी तयारी आहे. मी पन्नास वर्षापासून काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करतो अशा भावना प्रकाश मुगदिया यांनी व्यक्त केल्या. काँग्रेस पक्षाच्या जवळ सर्व प्रकारची माणसे आहेत. मात्र युवकांची वाणवा असल्यामुळे या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.
बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना आमदार अमित देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हे मोठे घर आहे,या घरात भांड्याला भांडे लागते त्यामुळे मतभेद आपल्याला दिसतात परंतु ते जिवंतपणाचे लक्षण आहे. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद नाहीत तसे मनभेद नसले पाहिजेत तरच राज्यात पुन्हा काँग्रेस उभी करता येईल. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे रणनीती ठरवण्याची गरज आहे. मनपाच्या निवडणुकीत जातीने लक्ष घालत निवडणूक कशी जिंकता येईल याबाबत नियोजन केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या वार्डात, आपल्या भागात कोणत्या प्रकारचे काम केल्यास आपल्याला यश येऊ शकते यादृष्टीने प्रयत्न करावेत. मनपाची निवडणूक ही आगामी सर्व मोठ्या निवडणुकीची पूर्वतयारी समजावी. प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक गंभीरपणे घेऊन औरंगाबाद महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा कसा फडकेल यादृष्टीने विचार केला पाहिजे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनपाची निवडणूक गंभीरपणे घेतल्यामुळे त्यांनी कोरोना येण्यापूर्वी मुजफ्फर हुसेन, किशोर गजभिये व दादासाहेब मुंडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांनी वेगळ्या बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीबाबत काय केले पाहिजे याबाबत माहिती दिलेली आहे. आगामी काळात अधिक गतिशील काम करून औरंगाबदची निवडणूक सोपी करू, त्यासाठी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही देशमुख म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन निवडणुक निरीक्षक दादासाहेब मुंडे यांनी केले तर सचिन शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
tag-amit deshmukh/congress/aurangabad/