अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
मुंबई : “हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे चिरंजीव निवडणुकीच्या  मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे(Amit Thackeray) निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे”, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी दिली.
वांद्रे येथे माध्यमांशी संवाद साधताना आ. शेलार बोलत होते. ते म्हणाले, भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल, तरी महायुतीने नाते जपायला हवे, असे मला वाटते. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.
नाना पटोलेंच्या आरक्षणविरोधी भूमिकेवर टीका करताना शेलार म्हणाले, परदेशात राहुल गांधी यांनी अकलेचे दिवाळे दाखवून दिले. त्याला नाना पटोले यांनी समर्थन करून आरक्षणाचा अपमान केला आहे. त्यामुळे पटोले यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. चैतन्यभूमीवर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांच्यासमोर जाऊन नाक घासावे. दुसरे म्हणजे, ज्या जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला, त्या आव्हाडांनी आरक्षणाच्या विषयावर तर बोलूच नये, असे टीकास्त्र आशिष शेलार यांनी डागले.

नवाब मलिकांना भाजपचा विरोधच!

नवाब मलिकांना(Nawab Malik) आमचा विरोध आहे. त्यांना तिकिट द्यावे, की नाही, याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील. परंतु, दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार नाहीत. आमची भूमिक ठाम असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
Social Media