काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, भाजप नेते राजाभाऊ पाटकरांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत(Lok Sabha elections) काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपासह इतर पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कल्याणमधील भाजपाचे महासचिव व संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर(Rajabhau Patkar) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या उपस्थितीत रविवारी टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले(Nana Patole) यांनी राजाभाऊ पातकर व कार्यकर्त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन कल्याणच्या घराघरात काँग्रेसचा विचार पोहचवा असे सांगितले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी(Narendra Modi) व देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) २०१४ साली जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले पण ती त्यांनी पूर्ण केली नसल्याने जनतेमध्ये भाजपाबद्दल तीव्र संताप आहे म्हणूनच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने भरघोस पाठिंबा दिला व महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष झाला. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात जाऊन उमेदवाराचा प्रचार करुन काँग्रेस मविआला सत्तेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जिंकण्याच्या उद्देशानेच काम करा व भ्रष्ट युती सरकारला सत्तेतून बाहेर काढा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यावेळी म्हणाले की, नाना पटोले यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व मिळाले असून काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात चांगली कामगिरीत होत आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे.लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला कौल दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस मविआला चांगले यश मिळून सत्ता येईल पण त्यासाठी काम करा, असे संजय दत्त म्हणाले.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष चव्हाण, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ब्रिजकिशोर दत्त, कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सचिव श्रीकृष्ण सांगळे, यशवंत हाप्पे आदी उपस्थित होते.

Social Media