मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी केले आहे.
सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार दि. 18 नोव्हेंबर ते गुरूवार दि. 9 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत. तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 10 डिसेंबर ते सोमवार दि. 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार दि. 20 डिसेंबर ते मंगळवार दि. 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार दि. 18 नोव्हेंबर ते गुरूवार दि. 30 डिसेंबर 2021 असा आहे.
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार दि. 4 जानेवारी 2021 रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.