मनसेचे तळ्यात- मळ्यात; एकला चलो वरुन पुन्हा बिनशर्त ?

राज  ठाकरे-फडणवीस-शिंदेंची गुप्त बैठक!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde),  देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), राज ठाकरे(Raj Thackeray) या तीन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी एकला चलो ची हाक दिली होती. मात्र आता काही जागांवर महायुतीचा पाठिंबा घेत पुन्हा बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी चाचपणी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई  : राज्यात सध्या लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा  दिल्यानंतर  विधानसभा  निवडणूक(Assembly elections) स्वबळावर लढणार असल्याचं मनसेने जाहीर केले असतानाच  महायुतीत पुन्हा एकदा ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर चर्चा झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीतील तपशील समोर आले आहेत.
काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं कळतं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी महायुतीला आपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभेला त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. अशावेळी फडणवीस, शिंदे, राज ठाकरे यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. शिवडी, वरळी, माहीमसह काही जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
 माहितीनुसार शनिवारी रात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून मुंबईत आले. रात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला. मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या तीन नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले.अशी सूत्रांची  माहिती आहे.
Social Media