मुंबई : देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो हा भाजपाचा दावा फोल ठरला असून धार्मिक मुद्द्यांवर ज्या देशात वाद निर्माण केले जातात त्या देशात गुंतवणूक येत नाही, तीच भारताची आज परिस्थिती झाली आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) यांनी केला आहे.
उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष, सरकारचे अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा.
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांवर ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे असे सांगितले जाते व ते माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण आरबीआयच्या अहवालानुसार मागील १० वर्षात उद्योगपती मित्रांचे १६.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज याच भाजपा सरकारने माफ केले आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जापेक्षा तब्बल ५.३५ लाख कोटी जास्ती रुपये कर्ज माफ केले. प्रत्यक्षात हे कर्ज २९ लाख कोटी रुपयांचे असल्याचे समजते व तेही हळूहळू माफ केले जाईल. शेतकरी, बेरोजगारांनी या सरकारचे काय बिघडवले आहे की भाजपा सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे, असा प्रश्न विचारून भारताच्या आयात निर्यातीवर त्यांनी भाष्य केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या तिमाहीत मागील तीन वर्षांच्या तुलनेत निर्यात १०.९ टक्क्यांनी घटली आहे तसेच आयातही घटली आहे, ही प्रचंड मोठी घट आहे. भारत ८७ टक्के कच्चे तेल आयात करतो व ते आता स्वस्त झाले आहे पण आपल्याकडील पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर मात्र कमी केलेले नाहीत. भाजपा सरकारने इंधनावर एक्साईज ड्युटीसह (Excise duty)विविध प्रकारचे सेस, कृषी सेस, रोड टॅक्स लावून तब्बल ३६ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जनतेच्या खिशातून काढून घेतली आहे.
युपीए सरकार असताना एक्साईज ड्युटी(Excise duty) ९ रुपये होती ती भाजपा सरकारने ३२ रुपयांपर्यंत वाढवली तर रोड टॅक्स(Road taxes) १ रुपयावरुन १८ रुपये केला. ज्यावेळी कच्च्या तेलाची किंमत ११२ डॉलर होती त्यावेळी हा भाजपा पेट्रोल ३५ रुपयांना मिळाले पाहिजे अशी मागणी करत होता. आता लोकांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत, शालेय वस्तू, स्मशानातील लाकूड यांवरही जीएसटी (GST)लावून लुट सुरु आहे. जनतेकडून कर वसूल करून देश चालवला जात आहे. भाजपा सरकारने आरबीआयलाही बरबाद केले आहे. आयातही कमी झाली, त्याचा फायदा सामान्य जनतेला व्हायला पाहिजे होता पण सरकार कर वसुली करुन मित्रांचे खिसे भरत आहे, असे लोंढे म्हणाले..
भारताच्या निर्यातीत प्रचंड घट, अमेरिकेच्या दबावापुढे मोदी सरकारची शरणागती, ईव्हीवरचा कर ११५ टक्क्यावरून १५ % वर.
रशिया(Russia) भारताला ५० डॉलरने कच्चे तेल देत होते पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी भारताला कच्चे तेल (Crude oil)अमेरिकेकडून घ्यावे लागेल असे बजावले आहे. ऍलन मस्क यांनी ज्याला खटारा म्हटले ते एफ-१६ विमान(F-16 aircraft) घेण्यास भारताला भाग पाडले जात आहे. भारताने कर लावला तर दुप्पट कर लावण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेला भारताची बाजारपेठ काबीज करायची आहे, यासाठीच ईलेक्ट्रिक वाहनांवरील ११५ टक्के कर कमी करून मोदी सरकारने तो १५ टक्क्यांवर आणला आहे. भारताचे लोखंड, अल्युमिनियम निर्यात होत नाही. चायनाने मार्केट काबिज केले आहे, व्हिएतनाम, चीन, बांग्लादेश भारताच्या पुढे आहेत. ज्या देशात कायदा सुव्यवस्था चांगली असते, वैज्ञानिक विचारसरणी असते, शोध, रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर भर असेल, देशात खरेदी शक्ती असेल त्यांचाच जगात डंका वाजतो, धर्माच्या नावाखाली भांडणे करणाऱ्या देशात गुतंवणूक येत नसते असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.