पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

मुंबई : पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

रुग्णालयातील अंतर्गत चौकशी ही निव्वळ धुळफेक, संबंधित डॉक्टरांवरही कठोर कारवाई करा.

यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे, जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बाळं आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर आहे.

जनतेच्या कराच्या पैशावर उभारलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अद्दल घडवा.

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *