बीड/मुंबई, दि. ९ मार्च २०२५ : औरंगजेबाने(Aurangzeb) वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. पण विरोधी पक्षाचा प्रांताध्यक्ष जाऊन भेटतो हा भाजपा व काँग्रेसच्या विचारातील फरक आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
सद्भावना यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही कार्यकर्ते व जनतेचा प्रचंड उत्साह, जागोजागी पदयात्रेचे स्वागत.
मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सद्भावना मेळाव्याने सांगता झाली. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खा. रजनीताई पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रविंद्र दळवी, खा. डॉ. कल्याणराव काळे. खा. डॉ. शिवाजी काळगे, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी मंत्री वसंत पुरके, आ. राजेश राठोड, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी, अमर खानापूरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, जालना काँग्रेसचे कार्याध्यक्ष भगवानगडाचे विश्वस्त राजेंद्र राख, एस. सी. विभागाचे सिद्धार्थ हत्तिअंबिरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बीड जिल्हा आज सुरक्षित नाही तर उद्या शेजारचे जिल्हेही सुरक्षित राहू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. भाजपाने राज्यात द्वेष पसरवण्याचे काम केले त्याला सद्भवानेने उत्तर द्यावे लागणार आहे. आधी ‘पन्नास खोके, एकमद ओके’ असे होते, पुन्हा ‘बोल मेरे आका’, आले आणि आता ‘खोक्या’ समोर आला आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत पण ते बीड प्रकरणावर बोलत नाहीत, दुसऱ्याला पुढे करतात. राजीनामा हा धनंजय मुंडे यांचा घेतला पण खरे पाहता संतोष देशमुख हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा झाला पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची वाईट अवस्था पाहिली असता घाशीराम कोतवाल हाच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे, असे सपकाळ म्हणाले.
बीड जिल्ह्यातील सद्भावना यात्रा संपली असली तरी हा आगाज सुरुच राहणार आहे. लवकरच परभणीमध्ये शिव- भीम यात्रा काढली जाणार आहे. राज्यात सामाजिक तेढ वाढत आहे. त्याला छेद देण्यासाठी सद्भावना वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि आज महाराष्ट्राचे जे चित्र आहे बदलायचे आहे, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.
सद्भावना पदयात्रेचा संदेश हा जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे हा होता. हा संदेश सर्वापर्यंत पोहोचवून आपल्याला सद्भावना वाढवायची आहे. पांडुरंगाच्या वारीच्या निमित्ताने सर्व बहुजन एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून अत्याचा-यांविरोधात लढले. आताही सर्वांना मिळून अत्याचा-यांविरोधात लढायचे आहे. महात्मा गांधीचा काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. मी सद्भावना यात्रा सुरु केल्यावर माझ्यावर टीका सुरु झाली. सामाजिक विभाजनाच्या विरोधात उभे राहिल्यामुळे माझ्यावर टीका सुरु केली जात आहे. ट्रोल केले जाईल, धमक्याही दिल्या जातील, खरेदी करण्याचा प्रयत्नही केला जाईल, अडथळे आणले जातील पण या सर्वांवर मात करून आम्ही सामाजिक एकोपा जपू, सद्भावना वाढवू आणि राजकीय फायद्यासाठी तणाव निर्माण करणा-यांविरोधात लढू, हा काँग्रेसचा विचार आहे, आम्ही तो जपू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
सद्भावना पदयात्रेने, राहुल गांधींचा ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’, संदेश पोहचवण्याचे काम झाले: बाळासाहेब थोरात
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद्भावना पदयात्रेने, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ हा राहुल गांधी यांचा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहचवला आहे. बीड जिल्हा हा सद्भावना जोपसणारा आहे. बीड जिल्ह्याची आजची जी परिस्थिती आहे ती कधीच अशी नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा आहे. विठ्ठलाच्या वारीत जसा वारकरी एका ऊर्जेने चालतो तीच ऊर्चा या पदयात्रेत दिसली. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धताने करण्यात आली. राज्यघटना हे आपले तत्वज्ञान असेल तर तिथे समाजात भेदभावाला स्थान नाही. मानव धर्म हा खरा धर्म व विठ्ठल हा त्यांचा देव आहे. राज्यात पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीला व संविधानाला धोका हा तो वेळीच ओळखा असे आवाहन करून संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.
बीडकरांचा एकच नारा, ‘जातीपातीला नाही थारा’, घोषणा देत हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला.
सद्भावना यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेकनूर येथील संत श्री बंकटस्वामी महाराजांना वंदन व ध्वजारोहण करून झाली, त्यानंतर मांजरसुंभा येथे कॅार्नर बैठक घेण्यात आली, दुपारच्या विश्रातांनीनंतर पदयात्रा पुन्हा सुरु झाली व सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सद्भावना मेळाव्याने या पदयात्रेची सांगता झाली. दोन दिवसाच्या या पदयात्रेत सेवालदाच्या शेकडो कार्यकर्त्यांचे पथक झेंडा घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. बीड शहरात पदयात्रेदरम्यान प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन केले. यावेळी बीडकरांचा एकच नारा, ‘जातीपातीला नाही थारा’, अशा घोषणा देत हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला होता.
जालन्याचे खा. डॉ. कल्याणराव काळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, राजेंद्र राख सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे यांनीही सद्भावना मेळाव्याला संबोधित केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले.
78zri7