महाराष्ट्रात आणि मुंबईत सध्या अनेक प्रमुख गावांत शहरात भाजपच्या एका मुख्यमंत्र्याच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या कटाऊटचा धुमाकूळ सुरू आहे. या भगवाधारी मुख्यमंत्र्याची प्रतिमा ‘हिंदूमसिहा’ अशीच असल्याचा प्रचार त्या निमित्ताने केला जात आहे. त्यासोबतच जो गुढ आणि छुपा संदेश देखील दिला जात आहे त्या ‘बटेंगे तो कटेंगे’ चा खरा अर्थ कोणता? त्याचा नेमका संदेश कुणाला आहे? आणि छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे(Bal Thackeray) यांच्या नंतर उत्तर प्रदेशातून येणा-या या संदेशाला नेमका कोणता प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता आहे? यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे, त्या चर्चेचा कानोसा घेतला तर कुछ कुछ ध्यान मे आता है. खूपच गंभीर पण अगदी मजेदार आहे हे प्रकरण बरं का?
हो तर मंडळी, चार महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक झाली, त्यामध्ये देखील महाविकास आघाडीने ‘संविधान खतरे मे’ असा अजेंडा (देवाभाऊंच्या किंवा भाजपच्या भाषेत फेक नरेटिव) चालविला. त्याचा परिणाम असा झाला की, ‘एक’नाथ शिंदेच्या नेतृत्वातील राज्यातील ट्रिपल इंजनवाल्या सरकारमध्ये सहभागी कोणत्याच पक्षाला एकांकी पल्याड जावून दहाच्या आकड्यापर्यंत मजल गाठता आली नाही. अगदी तेवीस खासदार असलेल्या सब के बडे भैय्या असलेल्या भाजपचा वारू एकांकी होवून ९ या शुभांकाजवळ थांबला. तर तिसरा असलेल्या एका पक्षाला मतदार इतका विसरला की अगदी एकच खासदार जिंकून आणता आला आहे. मग यावर विश्लेषण असे दिले जात आहे की, त्यावेळी ‘जातीगत जनगणना’ आणि ‘संविधान खतरे मे’ या विरोधकांच्या प्रचाराचा परिणाम नुकतेच राजकीय आरक्षण गमावलेल्या (ओबीसी) इतर मागासवर्ग समाजाला आणि आरक्षणाचा झिम्मा खेळत दहा वर्ष वाट पाहणा-या मराठा, धनगर समाजावर तसेच मुस्लिमांना दिली तशी हुलकावणी आरक्षण आपल्यालाही देवू शकेल या भितीने जगणा-या दलित आदिवासी समाजातही झाला म्हणे. आणि या सगळ्या बखेड्याचे मूळ असलेल्या भाजपला त्यांनी नाकारल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काही असो यावेळीही आरक्षणाच्या मुद्यावर दुखावलेले इतर मागासवर्ग, मराठा, धनगर, मुस्लिम, आणि आरक्षण जाण्याच्या भितीने जाग आलेले आदिवासी, दलित समाजाचे मतदार पुन्हा असेच जर वेगवेगळे राहून मतदान करतील तर नक्कीच सत्ताधारी महायुतीपासून दूरावतील याची भिती आहेच.
पुन्हा उध्दव ठाकरे यांच्या पक्षाकडून मुंबईतून मराठी माणासाचा हक्क काढून घेतला जात आहे. मराठी की गुजराती? मराठी की उत्तर-दक्षिण भारतीय हा जुनाच अजेंडा आहे. वरळी या एकेकाळच्या गिरणगावचे ह्रदय असलेल्या भागात जेंव्हा आदित्य ठाकरेचे भले मोठे पोस्टर ‘केम छो वरली? लागते त्यावेळीच हा नेमका मुद्दा काय आहे ते आपल्या लक्षात येत असेल. मग तेथे शिवसेनेत खासदारकी पटकन आल्या आल्या पदरात पाडून घेणारा कुणी देवरा नावाचा उमेदवार आता आमदारकीसाठी कसा काय उमेदवार म्हणून उभा राहतो? याचा देखील अर्थ समजू शकेल?!
जी गोष्ट हिंदू समाजाच्या जाती जातीत बिभाजनाची तीच प्रांतिक विभाजनाची आहे, आपल्या राष्ट्रगितामध्ये पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, असे म्हटले आहे. हे सारेच या मुंबईत आहेत बरे का? यांना ‘संविधान खतरे मे’ म्हटले तर काय वाटेल? किंवा ‘हिंदू खतरे मे’ म्हटले तर काय वाटेल? याचा विचार करून पहा. पण इतका साधा हा विषय असेल असे मात्र अजिबात नाही बरे का. सारा समाज एकत्र करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे च्या पोस्टरांची आणि त्यावरील ‘आ रहे है भगवाधारी’ च्या गाण्याची गरज का आहे? हे त्यावरून समजते का पहा.
गमंत पहा याच सा-या समाजांना याच पोस्टरमधून एक गूढ छुपा संदेश देखील दिला गेला आहे अशी चर्चा ऐकायला येत आहे. तो संदेश कोणता? तर याबद्दल असे सांगण्यात येते की, हा जो सगळा विभाजीत समाज आपली हिंदू ही ओळख बाजुला ठेवून आपापल्या वेगवेगळ्या उद्दीष्टासाठी भांडत आहे, त्याने जर का चूकूनही या पोस्टरला साद घालत त्याच्या बाजुने जायचे ठरवले तरीही त्यांचे ‘बटेंगे तो कटेंगे’ आहेच बरे का? म्हणजे कसे? तर मग स्वत:ला हिंदूच्या बाजूने ठेवले तर मराठा, धनगर ओबीसीच्या आरक्षणाचे काय? ते आरक्षण देणा-या संविधानाचे काय? त्यासाठीच्या जातीगत जनगणेनेचे काय? ते तर होणारच नाही हे गेल्या दहा वर्षात स्पष्ट झाले आहे. म्हणजे इस बार बटेंगे तो कटेंगे असा दुहेरी संदेशही याच पोस्टरमधून दिला जावू शकतो बरे! जसे दुधारी तलवार असते जी दोन्हीकडून कापू शकते तसेच हे प्रचाराचे पोस्टर आहे की नाही? आहे ना गमतीशीर?
आता जरा इतिहासात पाहूया का? पानीपताच्या युध्दापूर्वी दिल्लीच्या जवळ बुराडी घाट येथे मराठ्यांचे सरदार सेनापती दत्ताजी शिंदे (Sardar Senapati Dattaji Shinde)यांचा सामना रोहिला सेनापती नजीबखानाच्या सैन्यासोबत झाला होता. त्यावेळी लढताना असंख्य जखमांनी छिन्न भिन्न् झालेल्या दत्ताजीना मरण्यापूर्वी नजीबने विचारले होते, क्यो पाटील और लडोगे? तेंव्हा तश्याही अवस्थेत वीर योध्दा दत्ताजी शिंदे यांने बाणेदार उत्तर देत म्हटले होते, ‘हां बचेंगे तो और भी लडेंगे!’ त्याचे शब्द त्या नंतर त्याचेच वंशज असलेल्या महादजीनी पानीपतच्या(Panipat) लढ्यात वाचल्यानंतर खरे करून दाखवले होते. दिल्लीच्या तख्तावर अनेक वर्ष महादजीनी आपला ‘धाक’ बसविला होता. असा ज्या मुलूखाचा इतिहास आहे त्या मराठी मुलूखात सध्या विधानसभा निवडणूक म्हणजे ‘अस्तित्वाची लढाईच’ ठरल्याने महायुती भाजपने गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, कर्नाटलक गोवा अगदी आसामपासून आपल्या नेत्यांची फौज कामाला लावली आहे. तर महाविकास आघाडीमध्येही तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत उमेदवारीच्या माळा एकमेकांच्या गळ्याला कश्या बसतात ( की फास लावतात?!) याचा डेमो घेतला जात आहे! त्यामुळे महाराष्ट्राला या ‘बटेंगे तो कटेंगे’ चा दुहेरी अर्थ लक्षात घेवून ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ हा इतिहास देखील ध्यानात ठेवायला हवा नाही का? यावर तुम्हाला काय वाटत? करा विचार करा बरे! आणि मगच नक्की मतदानही करा हं! हे ही वाचा-२९ तारखेच्या आदल्या रात्रीपर्यंत ‘हा खेळ सावल्यांचा किंवा बाहुल्यांचा’ सुरुच राहणार?