“बहिणाबाई सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्कार २०२२” खंडूराज गायकवाड यांना जाहीर…!

येत्या २३ एप्रिल रोजी जळगाव येथील भव्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान..

मुंबई : यंदाचा “बहिणाबाई सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्कार” खंडूराज गायकवाड (Khanduraj Gaikwad) यांना जाहीर झाला असून सदर पुरस्कार येत्या २३एप्रिल रोजी जळगाव येथे भरविण्यात येणाऱ्या बहिणाबाई महोत्सवात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

खान्देशी कला आणि संस्कृती ग्लोबल व्हावी आणि त्याचे संवर्धन व्हावे. यासाठी दरवर्षी बहिणाबाई चौधरी महोत्सव समिती आणि भरारी बहुद्देशीय संस्था (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने भव्य असा महोत्सव आयोजित करते.या महोत्सवात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला समृद्ध आणि लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी बहिणाबाई चौधरी सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाते.
यावर्षी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य आणि मंत्रालयातील राजकीय वृत्तसंकलन करणारे पत्रकार खंडूराज गायकवाड यांच्या नावाची निवड महोत्सव समितीच्या आयोजकांनी केली आहे.

कोविड-१९ च्या महामारीच्या काळात अडचणीत सापडलेल्या लोककलावंताच्या पाठीशी भक्कमपणे खंडूराज गायकवाड हे उभे राहिले होते.त्यांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळलेले असताना देखील महाराष्ट्रातील कलावंताच्या व्यथा त्यांनी शासन दरबारी पोहचविल्या होत्या. कोविड महामारीच्या काळात वयोवृध्द कलावंताचे मानधन अनेक महिने थांबले होते.ते त्यांनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.आर्थिक संकटात सापडलेल्या लोककलावंतना कोरोना पॅकेज जाहीर करण्यासाठी त्यांनी महत्वाचा पाठपुरावा केला होता..सांस्कृतिक कार्यक्रम बंद झालेले असताना,ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचा इतरांबरोबर मोठा वाटा आहे.

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन “बहिणाबाई सांस्कृतिक विशेष सन्मान पुरस्कार २०२२” हा खंडूराज गायकवाड यांना घोषित करीत आहोत.असे महोत्सव समितीच्या आयोजकांचे म्हणणे असून येत्या २३एप्रिल २०२२रोजी जळगाव येथील सागर पार्कवर भव्य सोहळ्यात त्यांना सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहोत.असे त्यांनी सांगितले.

Social Media