अनुसुचित जाती जमातींच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध !: बाळासाहेब थोरात

मुंबई : राज्यातील अनुसुचित जाती जमातींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांसदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सोपवले. सोनियाजी यांनी अनुसुचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सुचना रास्त असून सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाज घटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप,  माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री चंद्रकात हंडोरे, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करत असतात तसेच सोनियाजी गांधी याही मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररुपी संवाद आहे. दलित व मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक काँग्रेस पक्षाने आयोजित केली होती. या बैठकीत काही मुद्दे चर्चेत आले होते त्या संदर्भात सोनियाजी यांनी पत्र लिहून काही सुचना केल्या आहेत.

आमची आघाडी भक्कम असून सरकार किमान समान कार्यक्रमानुसाच काम करत आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून सरकारच्या कामाचे श्रेय हे तिन्ही पक्षाचे आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच दलित, आदिवासी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कट्टीबद्ध आहे. या समाज घटकांचे न्याय-हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमी कार्यरत राहिला आहे. यापुढेही या समाजाच्या हितासाठी योजना योग्यरितीने राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही थोरात म्हणाले.

 

Tag- Congress handed over Soniaji Gandhi’s letter to the Chief Minister

Social Media